सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा), २ नोव्हेंबर (वार्ता.) – तालुक्यातील साखरखेर्डा येथील गोरेगाव फाटा येथे ख्रिस्त्यांकडून चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामूअण्णा महाराज शिंगणे यांनी निवेदनाद्वारे साखरखेर्डा पोलीस ठाणेदार यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे.
गेल्या काही मासांपूर्वी गोरेगाव फाटा या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून करण्यात येणारा धर्मांतराचा प्रयत्न बंद पाडण्यात आला होता; मात्र काही दिवसांपासून पुन्हा धर्मांतराचे प्रयत्न चालू झाले आहेत. या ठिकाणी गंभीर अवस्थेतील रुग्ण येत असून त्यांच्यावर योग्य वेळी वैद्यकीय उपचार न झाल्यास त्यांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. हे लक्षात घेता उपचारांच्या नावाखाली धर्मांतर करणार्यांवर बंदी घालण्यात आली होती; मात्र बंधनांना झुगारून प्रार्थनेच्या नावाखाली परत तेथे धर्मांतराचे प्रयत्न चालू झाले आहेत.
‘‘आम्ही ३० ऑक्टोबर या दिवशी त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला चित्रीकरण करण्यास बंदी केली. जर हे लोक त्या ठिकाणी फक्त देवाची प्रार्थनाच करत असतील, तर चित्रीकरणाला बंदी का आहे ? असा प्रश्न पडतो’’, असे या निवेदनात दामूअण्णा महाराज शिंगणे यांनी म्हटले आहे.
हा कार्यक्रम घेणार्यांवर कायमची बंदी घालावी. गोरेगाव फाट्यावरील बुवाबाजीच्या माध्यमातून होत असलेली गोरगरिबांची फसवणूक थांबवावी; अन्यथा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची शासनाने गंभीर नोंद घ्यावी, असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.
या प्रसंगी ह.भ.प. सत्यविजय महाराज सुरूशे, ह.भ.प. विठोबा महाराज आटोळे, ह.भ.प. गणेश महाराज नालेगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज गोते, ह.भ.प. सिद्धेश्वर महाराज बुंधे, ह.भ.प. वैभव महाराज मानतकर उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाधर्मांतर करणारे ख्रिस्ती समज देऊन गप्प बसत नसल्यामुळे अशा ख्रिस्त्यांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी राज्यात धर्मांतर बंदीची नितांत आवश्यकता आहे ! |