गोवा : विद्याप्रबोधिनी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा हिंदुत्वनिष्ठ राजकुमार देसाई यांचे निधन

विद्याप्रबोधिनी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक राजकुमार देसाई

पणजी, १ नोव्हेंबर (वार्ता.) – पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजकुमार देसाई (वय ५५ वर्षे)  यांचे १ नोव्हेंबर या दिवशी पहाटे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू असतांना निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वी उपचारार्थ महाविद्यालयात भरती करण्यात आले होते.

काही मासांपूर्वी गोवा सहकार भारती या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी दायित्व स्वीकारले होते. या जोडीला ते विद्याप्रबोधिनी विद्यालय आणि महाविद्यालय यांच्या व्यवस्थापनाचे कामही सांभाळत असत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून त्यांनी कार्याला प्रारंभ केला. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ते गोवा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले. त्यांच्या पश्चात पत्नी तथा पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या विद्यमान पंचसदस्या विश्रांती, कन्या अखिला आणि पुत्र अखिलेश, असा परिवार आहे. देसाई यांचे निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रोहन खंवटे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

राजकुमार देसाई यांचा हिंदु जनजागृती समिती आणि गोमंतक मंदिर महासंघ यांच्या कार्यात सक्रीय सहभाग

राजकुमार देसाई हे गोमंतक मंदिर महासंघाचे एक सदस्य होते, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातही ते सक्रीय सहभाग घेत असत. हिंदु जनजागृती समितीच्या पर्वरी येथे झालेल्या एका सभेला राजकुमार देसाई यांनी पूर्ण सहकार्य केले होते. सभेच्या आयोजनाच्या बैठकांचे आयोजन करणे, तसेच भोजन व्यवस्था आणि निवास व्यवस्था करणे आदींच्या माध्यमातून त्यांनी समितीच्या कार्यात सहभाग घेतला होता. राष्ट्रीय  शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती ४ ओळी आणि मोगलांचा इतिहास अनेक पाने भरून दिला होता. या विरोधात समितीने छेडलेल्या आंदोलनात राजकुमार देसाई यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. समितीने आयोजित केलेल्या अन्य आंदोलनामध्येही ते सक्रीय होते. सत्संग सोहळ्यासाठी सभागृह उपलब्ध करून देणे आदी माध्यमातून ते सनातन संस्थेच्या कार्यातही सहभाग घेत असत. सनातन परिवार आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते देसाई कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत.