अर्भकाला बेवारस सोडण्याची ५ वर्षांत ११ प्रकरणे, तर चालू वर्षी ४ प्रकरणे नोंद ! –  बाल हक्क संरक्षण आयोग, गोवा

(अर्भक म्हणजे नुकतेच जन्मलेले बालक किंवा नवजात बालक)

पणजी, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात अर्भकाला बेवारस सोडण्याची वर्ष २०१७ ते २०२२ पर्यंत (मागील ५ वर्षांत) एकूण ११ प्रकरणे नोंद झालेली आहेत आणि यामधील ४ प्रकरणे चालू वर्षीच नोंद झालेली आहेत, अशी माहिती गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दिली आहे. अर्भकाला बेवारस सोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा सरकारचे महिला आणि बाल कल्याण खाते, आरोग्य खाते अन् पोलीस खाते यांच्यासाठी ‘ॲडवायझरी’ (मार्गदर्शक तत्त्वे) प्रसिद्ध केली आहे. अर्भकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे.

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

बाल हक्क संरक्षण आयोगाने म्हटले आहे, ‘‘अर्भकाला असुरक्षित ठिकाणी बेवारस सोडण्याचे प्रकार वाढत आहेत. ३ अर्भके कचरा टाकण्याच्या ठिकाणी ठेवल्याने त्यांना कुत्रे चावल्याने त्यांचा मृत्यू झाला. कायद्याविषयी अज्ञान असल्याने अशा घटना वाढत आहेत. (कायदा कितीही केला, तरी त्यात पळवाट असते. त्यामुळे असले प्रकार कायद्याने नाही, तर प्रत्येकाला नीतीमत्ता शिकवूनच रोखता येतात. त्यामुळे शासनाने समाजला धर्मशिक्षण द्यावे ! कर्मफलन्याय, संचित, प्रारब्ध, ईश्वराचा न्याय आदी गोष्टी ठाऊक नसल्यानेच समाज स्वैर वागत आहे. समाजातील सर्व गुन्हे रोखण्यासाठी प्रत्येकालाच साधना शिकवणे आवश्यक बनले आहे ! – संपादक) बेवारस अर्भकाची काळजी घेण्यासाठी दत्तक घेणार्‍या संस्थेची नेमणूक करणे, तसेच अशा घटना टाळण्यासाठी संबंधित पालकांमध्ये जागृती करणे आणि याविषयी त्यांना संवेदनशील बनवणे यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी जागृती कार्यक्रमांचे आयोजन करणे आदी उपाययोजना महिला आणि बाल कल्याण खात्याने करणे आवश्यक आहे. अर्भकाला बेवारस सोडल्याच्या प्रकरणी अन्वेषण चालू असतांना पोलिसांनी कोणत्याही ‘बायलॉजिकल पॅरेंट्स’च्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवू नये.’’

(चित्रावर क्लिक करा)

बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा सरकारचे महिला आणि बाल कल्याण खाते, आरोग्य खाते अन् पोलीस खाते यांच्यासाठी प्रसिद्ध केलेली ‘ॲडवायझरी’ (मार्गदर्शक तत्त्वे) 👇🏻

Download