नागेशी येथे कीर्तन शिबिरात परिसंवाद
फोंडा, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – देव, देश आणि धर्म हे विषय आपल्या संस्कृतीशी जोडलेले असल्याने या गोष्टींचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कीर्तन हे लोकशिक्षण आणि प्रबोधन यांचे प्रभावी माध्यम असल्याने या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रभावीपणे प्रचार होणे शक्य आहे, असे मत दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक श्री. सागर जावडेकर यांनी व्यक्त केले. ‘गोमंतक संत मंडळ’ आणि श्री नागेश संस्थान, नागेशी यांच्या संयुक्त विद्यमाने नागेशी येथील श्री नागेश महारुद्र सभागृहात आयोजित २८ व्या निवासी कीर्तन शिबिरांतर्गत आयोजित ‘देव, देश, धर्म आणि संस्कृती संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात अध्यक्ष या नात्याने संपादक श्री. सागर जावडेकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर डॉ. लता नाईक, राज्याचे मुख्य आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर, ह.भ.प.(सौ.) संध्या पाठक, डॉ. गोविंद काळे आणि सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर यांची उपस्थिती होती.
डॉ. लता नाईक म्हणाल्या, ‘‘स्वावलंबन आणि नम्रता हे गुण असणे, तसेच उचित वेशभूषा आणि केशभूषा करणे या चांगल्या कृती आहेत. मुले चांगल्या वातावरणाशी कशी जोडली जातील ? हे पहाण्याचे दायित्व वडीलधार्यांचे आहे. ‘स्मार्टफोन’चा अतीवापर आणि अयोग्य वापर हे वरदान नसून शाप आहे. ‘स्मार्टफोन’चा चांगला वापर कसा करावा ? हे उमलत्या पिढीला शिकवले पाहिजे.’’
आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले, ‘‘सनातन संस्कृतीमध्ये सर्व विश्वाचा विचार आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करू नये. भारतीय संस्कृतीकडे आज आत्मकेंद्रितपणे आणि संकुचितपणे पाहिले जात आहे. दृकश्राव्य माध्यमाचा विपरीत परिणाम आजच्या पिढीवर जाणवत आहे.’’
ह.भ.प.(सौ.) संध्या पाठक म्हणाल्या, ‘‘मातृधर्म, पितृधर्म, बंधूधर्म, भगिनीधर्म, पत्नीधर्म, पतीधर्म, आचार्यधर्म, क्षात्रधर्म आदी समाज व्यवस्थेतील दंडक योग्य पद्धतीने पाळल्यास आपली संस्कृती टिकू शकेल.’’
डॉ. गोविंद काळे म्हणाले, ‘‘देशाबद्दलचा अभिमान प्रत्येक भारतियामध्ये असावा आणि ‘देश माझा आहे’ ही भावना विद्यार्थी दशेतूनच मुलांमध्ये रुजवली पाहिजे.’’
सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर म्हणाले, ‘‘आधुनिक विज्ञानातील संशोधनापेक्षा भारतियांनी केलेले संशोधन हे अतीप्रगत आणि परिपूर्ण आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीतून पाश्चात्त्यांनी केलेल्या संशोधनाविषयी विद्यार्थ्यांना शिकवले जाते; मात्र पाश्चात्त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सहस्रो वर्षे आधी ऋषिमुनी आणि महर्षी यांनी अतीप्रगत आणि परिपूर्ण संशोधन केलेले आहे. ऋषिमुनी आणि महर्षी यांनी साधना करून विश्वमनातील ज्ञान आत्मसात करून ते शास्त्र आणि संस्कृती यांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले. साधना केल्याने हे सर्व साध्य झाल्याने प्रत्येकाने साधना करणे अत्यावश्यक आहे.’’
परिसंवादाच्या प्रारंभी श्री नागेश देवस्थानचे अध्यक्ष श्री. दामोदर भाटकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सर्व वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी गोमंतक संत मंडळा’चे ह.भ.प. सुहासबुवा वझे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आगामी काळाला सामोरे जाण्यासाठी दैवी शक्ती संपादन करणे आवश्यक आहे. यासाठी संताचे मार्गदर्शन, तसेच देव, देश आणि धर्म हा विषय समजून घेण्यासाठी परिसंवादासारख्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे.’’