‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’च्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी. यांचा २९ ऑक्टोबरला कोल्हापूर दौरा ! – गिरीष चितळे

कोल्हापूर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’ही संघटना पूर्णपणे स्वदेशी असून यात अनेक मध्यवर्गीय सहभागी आहेत. या संघटनेचा प्रसार जगभरात सर्वत्र आहे. या संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूरसह देशभरात सातत्याने सामाजिक कामे करण्यात येतात. या संघटनेच्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी. या २९ ऑक्टोबरला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून संघटनेच्या वतीने होणार्‍या विविध उपक्रमांना त्या उपस्थित असणार आहेत, अशी माहिती ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’चे अध्यक्ष गिरीष चितळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘सहेली ग्रुप’च्या मंगला कुलकर्णी, डॉ. राजकुमार पोळ, प्रमोद शहा, रामदास रेवणकर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना (डावीकडून तिसरे) ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’चे अध्यक्ष गिरीष चितळे, तसेच अन्य

१. नाना चुडासामा यांनी ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’ची स्थापना केली. सध्या त्यांची मुलगी आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन्.सी. या त्याचे काम पहात आहेत. शायना एन्.सी. या कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत चालणार्‍या कामांची पहाणी करणार असून तेथील विविध गटांना भेटणार आहेत.

‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’चे संस्थापक नाना चुडासामा आणि फाऊंडेशनच्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी.

२. ‘जायंट्स ग्रुप’च्या वतीने सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे करण्यात आली आहेत. यात महिलांसाठी स्वच्छतागृहे, सांगलीत मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी शाळा, आष्टा स्मशानभूमी सुशोभिकरण, आष्टा येथे कुपोषित बालकांसाठी काम, सातारा येथे निर्भया पोलीस चौकी, कोल्हापूर येथे प्रत्येक वर्षी २ लाख वह्यांचे वाटप (गेली ७ वर्षे हा उपक्रम चालू आहे.), १ लाखांपेक्षा अधिक वृक्षांचे वृक्षारोपण अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

३. ‘सहेली ग्रुप’च्या मंगला कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘महिलांसाठीही ‘सहेली ग्रुप’ कार्यरत असून ८ मार्चला जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात जन्मणार्‍या मुलींसाठी ठेवी ठेवण्यात येतात अशा ६१ मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आल्या आहेत.’’