जांबसमर्थ (जालना) येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या देवघरातील मूर्ती चोरणार्‍या २ धर्मांध मुसलमानांना अटक !

जालना – जिल्ह्यातील जांबसमर्थ येथील समर्थ रामदासस्वामींच्या देवघरातील रामपंचायतनाच्या मूर्ती चोरणार्‍या २ धर्मांध मुसलमान चोरांना पोलिसांनी अंतिमतः २ मासांनंतर कर्नाटकमधून अटक केली. शेख हुसेनला अटक करून त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेने ४ मूर्ती कह्यात घेतल्या. मुख्य आरोपी शेख जिलानी हा अद्याप पसार आहे. मूर्तीचोर आणि विकत घेणारा अशा दोघांना पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

१. समर्थ रामदासस्वामी पूजन करत असलेल्या पंचधातूच्या ४०० वर्षांपूर्वीच्या या मूर्ती  हिंदूंसाठी मोठा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठेवा आहेत. त्यामुळे हिंदूंसाठी हा मोठा धार्मिक भावनेचा प्रश्‍न होता.

२. २२ ऑगस्टला या मूर्ती चोरल्या गेल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी शोध चालू करूनही बरेच दिवस चोरटे मिळत नव्हते. जनक्षोभ वाढू लागल्याने विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आणि त्यात विविध जिल्ह्यांतील निवडक अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतरही चोर मिळत नसल्याने तमिळनाडू येथील पोलिसांच्या ‘एक्सपर्ट आयडॉल’ विभागाचे साहाय्य घण्याचे ठरवण्यात आले होते.

३. अंतत: महाराष्ट्र पोलिसांनीच चोरांचा शोध घेतला. त्यामध्ये कर्नाटक पोलिसांचेही नंतर साहाय्य घेण्यात आले, असे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

४. चोरांचा तपास लागत नसल्याने भाविकांचा संताप अनावर झाला होता आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. ग्रामस्थ आणि समर्थांच्या मठातील मठाधिपती यांनी पोलिसांना २० नोव्हेंबरपर्यंतची समयमर्यादा दिली होती. उपमुख्यमंत्री, राज्याचे पोलीस महासंचालक आदींचीही या संदर्भात भेट घेण्यात आली होती. स्थानिक आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेतही हा प्रश्‍न उपस्थित केला होता. आरोपी पकडण्यासाठी २ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.