‘संजीवनी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. प्रवीण कोळी यांना ‘धन्वन्तरी’ पुरस्कार प्रदान !

डॉ. प्रवीण कोळी यांना ‘धन्वन्तरी’ पुरस्कार प्रदान करताना पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच अन्य

सांगली – ‘संजीवनी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. प्रवीण कोळी यांना या वर्षीचा मानाचा ‘धन्वन्तरी पुरस्कार’ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते धन्वन्तरी जयंतीच्या औचित्याने प्रदान करण्यात आला. ‘आरोग्य भारती सांगली जिल्हा’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे विलिंग्डन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला. डॉ. प्रवीण कोळी हे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतात.

डॉ. प्रवीण कोळी यांनी बावचीसारख्या ग्रामीण भागात ‘संजीवनी हॉस्पिटल’च्या माध्यमातून अनेक रुग्णांची सेवा केली आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. (सौ.) मंजुश्री कोळी यांच्या सहकार्याने विविध आरोग्य पडताणी शिबिरे, विनामूल्य शस्त्रक्रिया, गरजू रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा पुरवली आहे. ‘आष्टा डॉक्टर्स असोसिएशन’, ‘आष्टा क्रिटिकेअर हॉस्पिटल’, ‘कोविड सेंटर’ यांच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना जीवदान देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात सांगली येथील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. मिलिंद किल्लेदार यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, ‘आरोग्य भारती’चे जिल्हाध्यक्ष डॉ. विश्राम लोमटे, ‘विवेकानंद संस्थान’चे संचालक डॉ. राम लाडे यांसह अन्य उपस्थित होते.

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात हे एकमेव दैनिक हिंदूंची बाजू परखडपणे मांडते’, असे गौरवोद्गार काढले.