व्यावसायिक शुल्क न भरणार्‍या मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करणार ! – निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री, गोवा

व्यवसायविषयक शुल्क न भरणार्‍या मत्स्यव्यावसायिकांवर कारवाई

पणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – व्यवसायविषयक शुल्क न भरणार्‍या मत्स्यव्यावसायिकांवर कारवाई करणार, अशी चेतावणी मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली आहे. सचिवालयात मत्स्यव्यावसायिकांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

(सौजन्य : prime media goa) 

ते म्हणाले, ‘‘अनेक मत्स्यव्यावसायिक मालीम जेटी येथे त्यांचा व्यवसाय करत आहेत. काही मत्स्यव्यावसायिक सरकारकडून अनुदान घेत आहेत, तसेच जेटीवरील सुविधांचा लाभ घेत आहेत; परंतु व्यवसायविषयक शुल्क भरत नाहीत. मालीम जेटी सोसायटीचे अध्यक्ष त्यांच्या इच्छेनुसार कारभार करत आहेत. त्यामुळे मालीम जेटीवर काहीजण अवैधपणे मत्स्यव्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरवले आहे. एका मासापूर्वी अशा मत्स्यव्यावसायिकांना सरकारकडे नोंदणी करण्याची विनंती केली होती; परंतु त्यांनी नोंदणी केली नाही. त्यानंतर याविषयी चर्चा करण्यासाठी मत्स्यव्यावसायिकांसमवेत बैठक घेण्यात आली. ज्या मत्स्यव्यावसायिकांनी खात्याकडे नोंदणी केली नाही, त्यांना जेटीवर प्रवेश दिला जाणार नाही. शुल्क म्हणून त्यांना वार्षिक २ लाख रुपये भरावे लागतील. मत्स्य उद्योगाद्वारे सरकारला अपेक्षित महसूल मिळावा, तसेच हा उद्योग पारदर्शकपणे चालू रहावा, हा यामागील हेतू आहे.’’ (कर न भरता व्यवसाय करण्यातून मत्स्यव्यावसायिकांची नीतीमत्ता किती ढासळली आहे, ते दिसून येते. समाजात प्रामाणिकपणा अपवादानेच दिसून येतो, याचे कारण त्यांना धर्मशिक्षण नसणे, हेच आहे ! – संपादक)

(सौजन्य : Prudent Media Goa)

सरकारने अनेक वेळा विनंती करूनही काही मत्स्यव्यावसायिकांनी खात्याकडे नोंदणी केलेली नाही. त्यामुळे सरकारने अशा व्यावसायिकांसाठी १९ ऑक्टोबर २०२२ पासून मालीम, खारीवाडो आणि कुटबण येथील जेटी बंद केल्या होत्या. ज्या मत्स्यव्यावसायिकांनी शुल्क भरून खात्याकडे नोंदणी केली आहे, त्यांनाच मत्स्यव्यवसाय संकुल आणि जेटी यांमध्ये प्रवेश दिला जात होता; परंतु २५ ऑक्टोबरला दुपारी या जेटी पुन्हा खुल्या करण्यात आल्या आणि मत्स्यव्यवसायिकांचा व्यवहार नेहमीप्रमाणे चालू झाला.