‘ऋषी’राज !

‘‘मी जनतेला काय हवे ते देणार नाही, तर मी राष्ट्रहिताचे निर्णय घेणार – ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुनक

अंतिमतः भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले. याचाच दुसरा अर्थ ‘अख्ख्या ब्रिटनमध्ये त्यांची सध्याची हालखीची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी योग्य असू शकणारी अन् ब्रिटीश वंशाची एकही व्यक्ती उपलब्ध नाही’, असाच घ्यावा लागेल. ब्रिटनची बिकट परिस्थिती सांभाळता येणार नसल्याने बोरीस जॉन्सन, लिझ ट्रस आणि पेनी मॉर्डंट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मागे हटले आणि ऋषी सुनक यांना संधी मिळाली. सुनक यांना अत्यल्प राजकीय अनुभव असूनही आणि ते ब्रिटीश वंशाचे नसल्याने त्यांना निवडून देण्यास जनता उत्सुक नसूनही शेवटी अशी अपरिहार्यता आली की, देशाला वाचवण्यासाठी तेथील सर्व खासदारांना एका हिंदु वंशाच्या व्यक्तीचा आधार वाटला. याचे कारण सुनक यांच्याकडे असणारी बुद्धीमत्ता आणि त्यांचे गुण हेच आहे. कुठल्याही देशाचा प्रमुख विदेशी वंशाचा होणे तेथील जनतेला न रुचणे हे साहजिक आहे; परंतु सुनक हे एकतर दोन पिढ्यांपासून ब्रिटनमध्ये राहिल्याने ते तिथे एकरूप झाले आहेत आणि मुख्य म्हणजे ते त्याच्या देशाशी एकनिष्ठ आहेत. सुनक यांनी सांगितले आहे, ‘‘मी जनतेला काय हवे ते देणार नाही, तर मी राष्ट्रहिताचे निर्णय घेणार आहे. परिकथांमध्ये जनतेला गुंतवणार नाही.’’ ही तत्त्वनिष्ठाच कदाचित् त्यांना या सर्वाेच्च पदापर्यंत घेऊन आली आहे.

‘अन्नासाठी कि उष्णता निर्माण करण्यासाठी’ (‘इटिंग ऑर हिटिंग’) पैसे ठेवायचे एवढी गंभीर स्थिती सामान्य ब्रिटिशांपुढे येऊन ठेपली आहे आणि पुढील काळात ती वाढू शकते. ब्रिटनमध्ये आरोग्य सुविधांसारख्या अन्यही अनेक सार्‍या सुविधा सरकार जनतेला पुरवते. त्यामुळे आजच्या घडीला तेथे कित्येक लोकांच्या शस्त्रक्रिया पैशांअभावी प्रलंबित आहेत. असे जरी असले, तरी तेथील काही ऊर्जा आस्थापने आणि अन्य काही आस्थापने यांनी कोरोना महामारीच्या काळात मोठा पैसा मिळवला आहे. ‘त्यांच्याकडून पैसा देशासाठी वळता कसा करून घ्यायचा ?’, असे एक मोठे आव्हान सुनक यांच्यासमोर आहे, असे म्हणू शकतो. ‘वर्ष २०२९ पर्यंत तरी करकपात करणार नाही’, असे सुनक यांनी पूर्वीच घोषित केले होते. त्यामुळे कदाचित् जनतेनेही ती सिद्धता केलेली असणार. सुनक वित्तमंत्री असतांना त्यांनी हॉटेल व्यवसाय, कोरोना महामारीनंतर पर्यटन व्यवसाय आदींच्या दृष्टीने ब्रिटनमध्ये सुधारणा केल्या. ब्रिटनच्या कधी नव्हे एवढ्या कठीण काळात सत्ता सांभाळण्याचे आव्हान सुनक कसे पेलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष रहाणार आहे.

सुनक यांची ओळख खरेतर आरंभी ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) अशी होती; मात्र प्रत्यक्षात आता त्यांना तेथील अनेक उजव्या (कट्टर) विचारसरणीच्या खासदारांनी पाठिंबा दिला आहे. सुनक यांना ‘हिंदु धर्माविषयी आस्था आहे’, असे चित्र सध्यातरी पुढे आले आहे. त्यांच्या पहिल्या कन्येचे नावही ‘कृष्णा’ आहे. त्यांनी प्रथम मंत्री होतांना भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. ‘हिंदु धर्माचा मला अभिमान आहे’, असे त्यांनी पूर्वी म्हटलेलेही आहे. गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाचे दर्शन घेणे, घराबाहेर पणत्या ठेवणे, या त्यांच्या धार्मिक कृती माध्यमे आवर्जून दाखवत आहेत. याचा अर्थ त्यांना लगेच ‘भारताला पूर्णतः अनुकूल असे’ अशी समजण्याची घाईही कुणी करणार नाही. त्यामुळेच सुनक यांचे नाव घोषित झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देतांना ‘ऐतिहासिक संबंधां’चा आवर्जून उल्लेख केला आहे आणि ‘त्या संबंधांना आधुनिक भागीदारीत पालटू आणि वर्ष २०३० च्या दृष्टीने एकत्र मार्गक्रमण करू’, असे म्हटले आहे.

भारतीय पंतप्रधानांच्या या ट्वीटमधून दिसणारी हुशारी अतिशय उल्लेखनीय आहे. यामागे भारत-ब्रिटन संबंधांच्या सर्व पैलूंची जाणीव उघड होत आहे. प्रत्यक्षात मोदीही पुढील काळात ‘सुनक पंतप्रधान होण्याचा लाभ उठवून घेतील’, याविषयी शंका नाही. अर्थात् हिंदु वंशियांची मूलतः सहिष्णुवृत्ती असल्याने आणि सुनक हे त्यांच्या राष्ट्राप्रती निष्ठावंत असल्याने ते ब्रिटनचे हित नक्कीच साधतील; परंतु दीडशे वर्षांत ब्रिटिशांनी संपवलेला भारतियांचा सारा आत्मसन्मान अन् त्यांचा केलेला अपमान छोट्या छोट्या गोष्टींतून भारताला परत मिळवण्यास त्यांच्या माध्यमातून  पंतप्रधान मोदी यांना सोपे जाईल, एवढे तरी नक्की म्हणू शकतो. यामध्ये ‘कोहिनूर हिरा किंवा भवानी तलवार परत मिळवण्यासारख्या गोष्टीही कदाचित् असू शकतील’, अशी आशा करूया.

काळगतीपुढे कोण टिके ?

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले विन्स्टन चर्चिल यांनी भारताला हिणवून ‘भारतियांमध्ये राज्य करण्याची क्षमता नाही’, अशा आशयाचे विधान केले होते. १० वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी जेव्हा इंग्लंडमध्ये गेले, तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘कदाचित् १० वर्षांनी येथे भारतीय वंशाचा पंतप्रधान होऊ शकतो’’, त्यावर त्यांची पुष्कळ थट्टा करण्यात आली; कारण ब्रिटिशांना हे असंभव वाटत होते. इंग्रजांनी भारतावर अनन्वित अत्याचार केले आहेत. आज ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा पंतप्रधान झाला आहे. ब्रिटिशांनी भारतियांवर केलेल्या अत्याचारांची धग भारतियांमध्येच जागृत नसल्याने ती ब्रिटन आणि तिथेच दोन पिढ्या राहिलेल्यांमध्ये असण्याची शक्यताच नाही; परंतु कालगती अशी आहे की, ‘ब्रिटनमध्ये सूर्य मावळत नाही’, असे म्हटले गेले, त्या ब्रिटनला ‘भारतानेच आता कह्यात घेऊन त्यांची व्यवस्था लावावी’, असे काही तज्ञ म्हणू लागले. एवढी त्यांची दुःस्थिती सध्याच्या काळात झाली. भारतातील अब्जावधी रुपये त्या वेळी ब्रिटनने त्यांच्या देशात नेले आणि येथील उद्योग देशोधडीला लावून भारताला दरिद्री बनवले, ही सत्यस्थिती इतिहासाचे अभ्यासक राष्ट्रप्रेमी कदापि विसरू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये आज जी अत्यंत बिकट आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे, ती सावरण्यासाठी एक भारतीय वंशाची ‘ऋषी’ नाव असलेली व्यक्ती सज्ज झाली आहे, हा केवळ योगायोग नव्हे, तर ही कालगती आहे. मॉरिशसचे राष्ट्रप्रमुखही हिंदु वंशाचे आहेत. ‘येणार्‍या काळात विश्वात हिंदु धर्माचा मोठा मानसन्मान होणार आहे’, असे द्रष्टे सांगत आहेत, त्याची ही नांदी नव्हे ना ?

भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांचा पंतप्रधान हिंदु वंशीय होणे, ही कालगतीच !