गर्भवतीची वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती !
नागपूर – येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आलेल्या पत्नीकडे आधुनिक वैद्य आणि परिचारिका लक्ष का देत नाहीत ?, असे विचारल्याने गर्भवतीला रुग्णालयाच्या प्रभागातून (वार्डातून) हाकलून देण्यात आले आहे, असा आरोप एका दांपत्याने केला आहे. प्रभागाबाहेर काढल्यानंतर या गर्भवतीची उघड्यावर प्रसूती झाली. या धक्कादायक आणि संतापजनक प्रकाराविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
१. नेर तालुक्यातील बाळेगाव झोंबाडी येथील प्रतीक्षा पवार (वय २२ वर्षे) या विवाहितेस प्रसूती कळा चालू झाल्यामुळे तिच्या पतीने २१ ऑक्टोबरच्या रात्री रुग्णवाहिकेने तिला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले.
२. प्रभाग क्रमांक ३ मध्ये तिला भरती करण्यात आले. तेथील आधुनिक वैद्यांनी प्रतीक्षाला रक्त देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून तिच्या पतीला खासगी रक्त बँकेतून रक्ताची पिशवी आणण्यास सांगितले.
३. आर्थिक स्थिती नसतांनाही सचिन पवार यांनी पत्नीसाठी १ सहस्र ६०० रुपये देऊन रक्ताची पिशवी आणली.
४. ही रक्ताची पिशवी घेऊन ते पहाटे ४.३० वाजता स्त्रीरोग विभागात पोचले; मात्र तोपर्यंत तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी प्रतीक्षाची साधी पडताळणीही केली नव्हती, तसेच रक्ताची पिशवी दिल्यानंतरही रक्त लावण्यात आले नाही. याची विचारणा केली असता सचिन आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत प्रभागातून हाकलून देण्यात आले. रक्ताची पिशवीही त्यांच्या अंगावर भिरकावली, असा आरोप सचिन यांनी केला आहे.
५. पत्नीला घेऊन सचिन शासकीय रुग्णालय परिसरातच थांबले. सकाळी ८.३० वाजता प्रतीक्षा यांनी उघड्यावर बाळाला जन्म दिला. उघड्यावर प्रसूती होत असल्याने परिसरातील नागरिक तिच्या साहाय्याला धावून आले; मात्र वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही साहाय्य केले नाही. प्रतीक्षाने स्वत:च्या हाताने बाळाची नाळ तोडली. प्रसूतीनंतर ही महिला पतीसह गावी निघून गेली. प्रतीक्षाची ही दुसरी प्रसूती होती.
‘ती’ गर्भवती महिला स्वतःच गेली, आरोप तथ्यहीन ! – डॉ. सुरेंद्र भुयारल अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेस प्रभागातून हाकलून लावल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ती महिला ‘मला येथे रहायचे नाही’, असे म्हणून स्वतःच प्रभागातून निघून गेली. बाहेर पडल्यानंतर प्रसूती कळा वाढल्याने तिथेच तिचे बाळंतपण झाले. रुग्णाच्या नातेवाइकांकडून महाविद्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तथ्यहीन आरोप करण्यात येत आहेत.’’ |
संपादकीय भूमिकाअसंवेदनशीलतेचा कहर ! |