अनेक मंदिरांच्या प्रांगणांत आजही दीपमाळ अस्तित्वात आहेत. सण किंवा उत्सव यांच्या दिवशी त्यांचे प्रज्वलन करतात. तेव्हा दिसणारे नयनमनोहारी दृश्य शब्दातीत आहे. मंदिरांच्या खालच्या पायरीपासून ते कळसापर्यंत केली जाणारी दिव्यांची आरास आणि आकर्षक मांडणी सर्वश्रुत आहे. आजही असा दीपोत्सव करतातच. असे दिवे जेव्हा नदीच्या पात्रात सोडले जातात, तेव्हा पुष्कळ मनोहारी दृश्य दिसते. हरिद्वारला गंगा नदीच्या पात्रात असे असंख्य दीप सोडले जातात, तेव्हा पाण्यासमवेत वहात जाणारे हे दीप अन् त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब हे नयनमनोहारी दृश्य मनात कायमचे घर करते. अयोध्येमध्येही गत २ वर्षांमध्ये शरयू नदीच्या काठावर सहस्रो दीप प्रज्वलित करण्यात आले. ते दृश्यही अद्वितीय होते.