भाऊबीज (यमद्वितीया)

१. तिथी

कार्तिक शुक्ल द्वितीया

२. इतिहास

या दिवशी यम त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.

 ३. महत्त्व

अ. अपमृत्यू येऊ नये; म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.
आ. ‘या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो आणि त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.
इ. यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे : अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते.
ई. बहिणीने भावाला ओवाळणे : या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. ‘या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’

भाऊबिजेच्या दिवशी औक्षण करतांना होणारे सूक्ष्मातील परिणाम

१. भाऊबिजेच्या दिवशी भावाला ओवाळतांना स्त्रीमध्ये वात्सल्यभाव अधिक कार्यरत असतो.
२. औक्षणाच्या वेळी भावाच्या श्वसनक्रियेतून त्याच्या देहात तेजतत्त्वाचे कण प्रवाहित होतात. त्यामुळे त्याच्या आयुष्यात वाढ होते, तसेच त्याच्या देहाभोवती संरक्षक-कवचही निर्माण होते.
३. औक्षण करतांना बहिणीमध्ये अप्रकट स्वरूपात असलेली शक्तीची स्पंदने प्रकट स्वरूपात कार्यरत होऊन त्यांचे भावाकडे प्रक्षेपण होते. त्यामुळे भावाला कार्यशक्ती प्राप्त होते.
४. भाऊबिजेच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जाऊन केवळ बहिणीच्या हातचे अन्न ग्रहण करावे, असे सांगितले जाते. असे केल्याने भाऊ आणि बहीण यांच्यातील मायेच्या नात्यामुळे निर्माण झालेल्या देवाण-घेवाण हिशोबाचे प्रमाण न्यून होते.’

– कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका सुयश गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), डोंबिवली.) (२७.६.२०११)


भाऊबीज (यमद्वितीया) : अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा –

https://sanatanprabhat.org/marathi/621019.html

_______________________