रशियाने पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन यांना दाखवले भारताचा भाग !

चीन-पाकिस्तान यांना चपराक !

मॉस्को (रशिया) – रशियाची वृत्तसंस्था ‘स्पुटनिक’ने शांघाय सहकार्य संघटनेचे मानचित्र जारी केले आहे. त्यामध्ये तिने पाकव्याप्त काश्मीर, अक्साई चीन यांच्यासमवेत संपूर्ण अरुणाचल प्रदेश यांना भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दाखवले आहे. भारताच्या सरकारी सूत्रांनुसार ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या संस्थापक सदस्यांच्या नात्याने रशियाने योग्य पद्धतीने मानचित्र प्रकाशित करून एकप्रकारे चांगला पायंडा पाडला आहे. या दोन्ही क्षेत्रांना भारताचा भाग दाखवणे हे राजनैतिकदृष्ट्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले जात आहे.

याआधी चीननेही शांघाय सहकार्य संघटनेचे मानचित्र जारी केले होते. त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन यांना भारताचा भाग न दाखवता अनुक्रमे पाक आणि चीन यांच्या भूमीत असल्याचे रेखांकित करण्यात आले होते. आता ‘स्पुटनिक’च्या नव्या मानचित्रातून रशियाने चीन आणि पाकिस्तान यांना चपराक लगावली आहे.

काय आहे शांघाय सहकार्य संघटना ?

शांघाय सहकार्य संघटना ही एशिया आणि युरोप येथील काही देशांमधील राजकीय अन् आर्थिक साहाय्य यांना बळकटी देण्यासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. यामध्ये भारत, रशिया, चीन, पाकिस्तान यांच्यासमवेत एकूण ८ पूर्ण सदस्य देश आहेत, तर अन्य १३ देश हे निरीक्षक अथवा संवाद भागीदार म्हणून कार्यरत आहेत.