फटाक्यांच्या चाचणीच्या अहवालानंतर जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची सूचना देऊ !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकार्‍यांची माहिती

मुंबई – फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. १२५ डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमाचे पालन व्हावे; म्हणून कडक तपासणी चालू आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या २२ प्रकारच्या फटाक्यांची एम्.पी.सी.बी.कडून उल्हासनगरच्या सेंच्युरी मैदानात चाचणी घेण्यात आली आहे. यात एक सहस्र, पाच सहस्रांच्या माळा, सुतळी बाँब, आकाशात जाऊन फुटणारे फटाके यांची डेसिबल मीटरवर चाचणी झाली. या चाचणीचा अहवाल लवकरच महापालिका आणि पोलीस यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची सूचना देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली.

‘मुंबईत अनुमतीविना फटाके विक्रीवर बंदी घालण्यासाठी परवाना नसलेल्या फटाका विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल’, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


डोंबिवली-कल्याणमधील रस्त्यांवरील फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई करा !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे, २० ऑक्टोबर (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निश्चित केलेल्या मैदानातच विक्रेत्यांनी फटाक्यांची विक्री करावी. मैदाने सोडून मंच लावून रस्त्यांवर फटाके विक्री चालू केली असेल, तर असे फटाके विकणार्‍या दुकानांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांत एखादी दुर्घटना घडल्यास त्याचे खापर अनुमती देणार्‍या महानगरपालिकेच्या प्रशासनावर फुटणार आहे. दिवाळी सण असला, तरी एकाही फटाके विक्रेत्याला रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्रीचा मंच उभारणीस अनुमती देऊ नका, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.