नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी विद्यापिठात स्वतंत्र कक्ष स्थापन करणार ! – कुलगुरु डॉ. कारभारी काळे

पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांनी घोषित केले. त्याचप्रमाणे धोरण निश्चितीसाठी ‘टास्क फोर्स’चीही स्थापना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी कुलगुरु, कुलसचिव, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे सदस्य, शैक्षणिक विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते. विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी शैक्षणिक धोरणासंदर्भात वेळोवेळी अधिसूचना अन् मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार असून त्यांच्या मार्गदर्शक सूचनेन्वये कक्षाचे कामकाज चालणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी ४ मंडळे स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला भारतीय ज्ञान व्यवस्था (इंडियन नॉलेज सिस्टीम), समुदाय सहभाग (कम्युनिटी एंगेजमेंट) वैश्विक मानवी मूल्य, भाषांतर अभ्यास या विषयांवर अभ्यास मंडळे असतील.