पिंपरी (पुणे) येथील ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल, एकाच मृतदेहावर २ वेळा अंत्यसंस्कार !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वाय.सी.एम्.) शवविच्छेदन गृहातून स्नेहलता गायकवाड आणि मीना गाडे या २ महिलांच्या मृतदेहांची १९ ऑक्टोबर या दिवशी अदलाबदल झाली. मीना यांच्या नातेवाइकांनी स्नेहलता यांचा मृतदेह कह्यात घेतला आणि घाईने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मृतदेह कह्यात घेल्यानंतर तो आपल्या आईचा नसल्याचा संशय मीना यांच्या मुलाने व्यक्त केला होता; मात्र शवविच्छेदन केल्याने तो तसा दिसत असल्याचे उत्तर त्यांना मिळाले होते. स्नेहलता गायकवाड यांच्या नातेवाइकांना ही गोष्ट समजल्याने त्यांनी रुग्णालयात तोडफोड केली. अदलाबदलीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्नेहलता यांच्या कुटुंबियांनी स्मशानभूमीत जाऊन पुन्हा एकदा अंत्यसंस्कार केले.

यावर रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, शवविच्छेदनगृहात मृतदेह आणण्याचे तिथून तो शवविच्छेदनासाठी आधुनिक वैद्यांकडे देण्याचे आणि त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात देण्याचे दायित्व पोलिसांचे असते; मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे मनुष्यबळ अल्प असल्याने, तसेच पोलीस वेळेवर उपलब्ध नसल्याने शवविच्छेदन गृहातील कर्मचारी मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात देण्याचे काम करतात. (पोलिसांकडे मनुष्यबळ अल्प आहे; म्हणून कर्मचार्‍यांना त्या कृती करायला दिल्याने किती महागात पडले, याचे उदाहरण ! माणसाला माणूस देऊन कामे होत नाहीत, हे प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार !
  •  नातेवाइकांच्या भावनांचा विचार न करणार्‍या असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !