‘लिट्टे’कडून तमिळनाडूत पाय रोवण्याचा प्रयत्न

  • मोठ्या राजकारण्यांना अर्थपुरवठ्यासाठी लक्ष्य करण्याचा प्रयत्न

  • अनेक ठिकाणी शस्त्रास्त्रांचे कारखाने उभारले !

चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलम्’ (लिट्टे) ही संघटना तमिळनाडूमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने राज्यात अनेक ठिकाणी शस्त्रस्त्रांचे कारखाने उभारले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) मिळाली आहे. या संघटनेकडून राज्यातील मोठे राजकारणी आणि व्यावसायिक यांना अर्थपुरवठा करण्यासाठी लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. एन्.आय.ए.ने यापूर्वी मिळालेल्या माहितीवरून काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या.

१. तमिळनाडू पोलिसांनी १९ मे या दिवशी सालेम जिल्ह्यातील सेवापेट येथून नवीन मुथू आणि संजय प्रकाश या २ तरुणांना कह्यात घेतले होते. त्यांच्याकडून २ पिस्तुले, गन पावडर, काही शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे दोन्ही तरुण लिट्टेसाठी काम करत असल्याचे अन्वेषणात समोर आले. त्यानंतर हे प्रकरण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले.

२. एन्.आय.ए.ने केलेल्या त्यांच्या चौकशीतून श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर लिट्टेने तिचे काम भारतात हालवल्याची माहिती समोर आली. पूर्वी श्रीलंकेत शस्त्रे बनवली जात होती; मात्र आता स्थानिक लोकांच्या साहाय्याने तमिळनाडूतच ती बनवली जात आहेत.

३. लिट्टे तिच्या सदस्यांना जंगलात टिकून रहाण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. तमिळनाडूमध्ये धाडीमध्ये जंगलात वास्तव्य करतांना जिवंत रहाण्यासाठी उपयोगी साहित्य आणि जंगली बियाण्यांपासून बनवलेले विषही सापडले. हे विष लिट्टेच्या सदस्यांकडे नेहमी असते. जेणेकरून कोणत्याही कारणास्तव सदस्य पोलीस किंवा अन्वेषण यंत्रणा यांच्या हाती लागले, तर ते हे विष खाऊन जीव देऊ शकतात.

४. एन्.आय.ए.च्या धाडीमध्ये वर्ष २००९ मध्ये मारला गेलेला लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन् याच्यावर लिहिलेली पुस्तके, छायाचित्रे आणि अनेक आक्षेपार्ह साहित्य सापडले. तमिळनाडूतील अनेक मोठे राजकारणी आणि उद्योगपती यांची सूची मिळाली. अशी काही कागदपत्रेही सापडली होती, ज्यावरून असे दिसून आले की, या सूचीत समाविष्ट असलेले नेते लिट्टेचे लक्ष्य होते.