जेवणात अळ्या सापडल्याने १३ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली !

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठातील वसतीगृहातील धक्कादायक प्रकार !

वर्धा – येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठातील वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या सापडल्या. यामुळे १३ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. यात ५ मुली आणि ८ मुले यांचा समावेश आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात रात्री ९ ते २ वाजेपर्यंत आंदोलन करत कारवाईची मागणी केली. या वेळी विद्यार्थ्यांनी घोषणाही दिल्या. विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री विद्यार्थ्यांशी चर्चा करून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. गेल्या दीड ते २ मासांपासून अळ्या सापडत असल्याचा प्रकार घडत आहे.

‘विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही ते याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. आम्ही तक्रार केल्यावर ते आम्हाला विचारतात, ‘‘तुम्ही इथे शिकायला येता कि जेवायला ?’’ (अशा संवेदनशून्य विद्यापीठ प्रशासनावर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणार्‍यांना कठोर शिक्षा करावी !