कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत पहिली अटक !

हिंदु महिलेचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी सय्यद मोईनला अटक

बेंगळुरू – कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत पहिली अटक करण्यात आली आहे. बेंगळुरूतील सय्यद मोईन नावाच्या एका २४ वर्षांच्या कोंबडी विक्रेत्याला एका १९ वर्षांच्या हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली.


५ ऑक्टोबर या दिवशी पीडित हिंदु मुलगी अचानक तिच्या घरातून बेपत्ता झाली. यानंतर मुलीच्या पालकांनी संशयिताच्या विरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सय्यद मोईन आणि पीडित तरुणी यांचा शोध लावून त्यांची चौकशी केली. या वेळी पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, मोईनने विवाहाचे आमीष दाखवून तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. त्यानुसार ६ ऑक्टोबरला त्याने तिला फूस लावून आंध्रप्रदेशातील पेनगोंडा येथे नेले आणि तेथील एका मशिदीत तिचे धर्मांतर केले; मात्र त्याने तिच्याशी अद्याप विवाह केलेला नाही.


पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य संरक्षण कायद्या’च्या कलम ५ च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली. तसेच पीडित मुलीला तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

मोईन हा पीडित कुटुंबाच्या बेंगळुरूमधील घराजवळच्या गल्लीत रहातो. पीडित मुलीच्या आईला मोईनविषयी संशय होता आणि तिने तिच्या मुलीला सावध केले होते; मात्र पीडित मुलगी त्याच्या भूलथापांना बळी पडली होती. त्याचा अपलाभ उठवत मोईनने तिला तिच्या घरातून पळवले होते. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.