शोपिया येथे काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या

  • काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून लक्ष्यित हिंसा चालूच !

  • काश्मिरी हिंदू आणि सरकारी कर्मचारी यांचा संताप !

शोपिया (जम्मू-कश्मीर) – येथील चौधरी गुंड भागामध्ये पूरण कृष्ण भट या काश्मिरी हिंदूची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. भट हे याच भागातील रहिवासी होते. ते त्यांच्या बागेकडे जात असतांना त्यांच्यावर आतंकवाद्यांनी गोळीबार केला. यात घायाळ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर सुरक्षादलांकडून संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या हत्येनंतर राज्यातील काश्मिरी हिंदूंकडून रस्त्यावर उतरून राज्य प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत.

१. काश्मिरी पंडित संघर्ष समितीने ट्वीट करून संताप व्यक्त करतांना लिहिले आहे की, काश्मीरमध्ये काहीही पालट झालेला नाही. ‘काश्मीरमधील परिस्थिती वर्ष १९९० सारखी आहे’, असा हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संदेश आहे.

२. समितीने आणखी एका ट्वीटमध्ये आरोप केला आहे की, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे पूरण भट यांच्या पार्थिवावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबावर दबाव निर्माण करत आहेत; कारण त्यांना काश्मीर खोर्‍यात शांतता असल्याचे दाखवायचे आहे.

३. काश्मिरी हिंदू असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांनी या हत्येच्या विरोधात जम्मूमधील कॅनॉल रोड रोखून निषेध केला. ते म्हणाले की, खोर्‍यातील परिस्थिती सामान्य नसल्याचे आम्ही सरकारला वारंवार सांगितले आहे; मात्र तरीही ठोस कारवाई होत नाही. आम्ही जवळपास ५ मासांपासून आंदोलन करत आहेत आणि आम्हाला काश्मीर बाहेर स्थानांतर करण्याची मागणी करत आहेत; परंतु आमच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे.

४. यापूर्वीच ऑगस्ट मासामध्ये सफरचंदाच्या बागेमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदू सुनीलकुमार भट यांची हत्या केली होती. या हत्येचे दायित्व काश्मीरमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘कश्मीर फ्रिडम फायटर्स’ ने घेतली होती. सुनीलकुमार भट तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे या संघटनेने म्हटले होते.

संपादकीय भूमिका

  • काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी असुरक्षितच राज्य ठरले आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
  • काश्मीरमध्ये हिंदूंच्या होणार्‍या हत्यांविषयी देशातील ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे नेते, संघटना कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !