मुंबई – गोवा आणि उत्तराखंड येथे समान नागरी कायदा आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक राज्य तसा प्रयत्न करेल. तो आला पाहिजे आणि येईल. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये तसे आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्राच्या व्यासपिठावर अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. लोकसंख्या नियंत्रण वाढीविषयी बोलतांना फडणवीस म्हणाले की, भारतीय पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचा विचार करावा लागेल. अन्य देश लोकसंख्येवर नियंत्रण ठेवत आहेत. हे करत असतांना लोकसंख्येचा ढाचा पालटणार नाही किंवा ती एकतर्फी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे, असे माझे मत आहे.