रशियाकडून फेसबूकचे मूळ आस्‍थापन ‘मेटा’ आतंकवादी संघटना घोषित !

मॉस्‍को (रशिया) – फेसबूक चालवणारे अमेरिकेतील आस्‍थापन ‘मेटा’च्‍या विरोधात ११ ऑक्‍टोबर या दिवशी रशियाने मोठी कारवाई केली. रशियन सरकारने मार्क झुकरबर्ग यांच्‍या मेटा आस्‍थापनाचा आतंकवादी आणि आतंकवादी संघटना यांच्‍या सूचीत समावेश केला आहे.

मार्च २०२२ मध्‍ये रशियन सरकारने फेसबूक, इन्‍स्‍टाग्राम आणि ट्‍विटर यांसारख्‍या सामाजिक माध्‍यमांना रशियात बंदी घातली आहे. मॉस्‍कोच्‍या एका न्‍यायालयाने फेसबूकवर आतंकवादी कारवाया करत असल्‍याचा आरोप केला होता. ‘मेटा’ युक्रेनमधील फेसबूक वापरकर्त्‍यांना रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्‍साहन देणारी माहिती प्रसारित करण्‍याची अनुमती देत असल्‍याचाही आरोप न्‍यायालयाने केला. मेटाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. या वर्षाच्‍या आरंभी मार्क झुकरबर्ग यांना रशियामध्‍ये प्रवेश करण्‍यास बंदी असलेल्‍या ९६३ प्रमुख अमेरिकन व्‍यक्‍तींच्‍या सूचीतही समाविष्‍ट करण्‍यात आले होते.