सर्वोच्च न्यायालयाने देहलीमधील फटाक्यांवरील बंदी कायम ठेवली !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे नेते मनोज तिवारी यांच्या राज्य सरकारच्या फटाक्यांवरील बंदी उठवण्याच्या याचिकेवर सुनावणी करतांना राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये असलेली बंदी कायम ठेवण्याचा निकाल दिला. यामुळे देहलीकरांना फटांक्याविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

न्यायालयाने राजधानीमध्ये वाढत असलेल्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत म्हटले की, येथे लोकांना श्‍वास घेण्यातही अडचणी येत आहेत. अशा स्थितीत फटाक्यांवरील बंदी उठवली जाऊ शकत नाही. असे केले, तर येणारा काळ आपल्यासाठी कठीण असेल.

देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने १ जानेवारी २०२३ पर्यंत फटाक्यांचे उत्पादन, वितरण आदींवर प्रतिबंध लादल्याच्या विरोधात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या निर्णयाला फटाके व्यावसायिकांनी विरोध दर्शवला होता.

संपादकीय भूमिका

खरेतर फटाक्यांमुळे प्रदूषण होण्यासह पैशांचाही चुराडा होत असल्याने केवळ देहलीपुरती ही बंदी मर्यादित न रहाता सरकारने भारतभर फटाक्यांवर बंदी घालायला हवी !