सातारा येथे पुढील वर्षीचा ‘दसरा महोत्सव’ शासनाच्या सहकार्यातून होणार ! – शंभूराज देसाई

शंभूराज देसाई

सातारा, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक राजघराण्याची परंपरा आहे. येथे प्रतिवर्षी ‘शाही दसरा महोत्सव’ साजरा करण्यात येतो; मात्र पुढील वर्षापासून हा महोत्सव शासनाच्या सहकार्यातून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मंत्री देसाई पुढे म्हणाले की, सातारा येथील ‘शाही दसरा महोत्सवा’विषयी माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनीही याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे. पुढील वर्षापासून ‘शाही दसरा महोत्सव’ शासनाच्या सहकार्यातून करण्याविषयी मी स्वत: पालकमंत्री म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी बोलणार आहे. सातारा जिल्हा ही शूरवीरांची भूमी आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासमवेत तो जागतिक स्तरावर नेण्याचा आमचा मानस आहे. यासाठीच हे प्रयोजन आहे.