देवाच्या सणांचे निमित्त करून धांगडधिंगाच घातला जातो. नवरात्रातही देवीची पूजा, स्तोत्रे, देवीमहात्म्य वाचन या सर्वांनी गहिवरून जाणारी माणसे दिसतच नाहीत. सवाष्ण, कुमारिका या स्वरूपात स्त्रीचा आदर करणे आणि तिला मातृस्वरूपात बघणे, ही उदात्तता दिसतच नाही. धुंद गरबा, मेजवान्या, उत्तमोत्तम ड्रेस (पोशाख) आणि उत्तान नृत्य हा आपला आनंद झाला. यात देवीची सेवा कुठे आहे ?
महाराष्ट्रात ४-५ दिवसांपूर्वी दायित्वशून्यपणे बेफाम होऊन नाचणे ५ तरुणांना महागात पडले आहे. बेधुंद गरबा खेळतांना २५ ते ३० वयोगटांतील ही मुले हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावली आहेत. विरारचा मनीष जैन बेभान होऊन दांडिया खेळत होता आणि त्याचे ६५ वर्षांचे वडील नरपत जैन त्याला कौतुकाने पहात होते. काही वेळातच मनीषला झटका येऊन तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ते पाहून वडिलांनाही हृदयविकाराचा झटका येऊन तेही मृत पावले. डोंबिवलीचा वृषभ भानुशाली, वाशीममधील गोपाल इन्नानी, कारंजा येथील सुनील काळे, तारापूरचा वीरेंद्र राजपूत या मुलांना गरबा खेळतांना झटका येऊन त्यांचा अंत झाला. व्यायामाची कोणतीही सवय नसतांना भावनेच्या भरात अचानक धुंद होऊन गरबा खेळायला प्रारंभ केला. त्यातच मोठ्या आवाजामध्ये डिजेही चालू झाला की, आधीच हृदयाचे ठोके वाढलेले असतात आणि मोठ्या आवाजाचा हृदयावर ताण पडून झटका येतो.
आपल्या हिंदु धर्माची शिकवण ‘संयम पाळणे’, ही आहे. ध्यान ही आपली उपासना आहे, शांतता हे आपले अध्यात्म आहे. श्रद्धा, भक्ती आणि सबुरी ही आपली (हिंदु) संस्कृती आहे, धांगडधिंगा नव्हे !
(साभार : सामाजिक माध्यम)