राज्यात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा लागू करावा ! – नरेंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

हिंदूंनो, घटना घडल्यावर नव्हे, तर प्रतिदिनच संघटित होऊन आपला वचक निर्माण करा !

नवी मुंबई, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत असून ख्रिस्ती संस्थांकडूनही त्यांचे शोषण झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी राज्यात लवकरात लवकर धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वाशी येथे केली. ते नवी मुंबई धर्मरक्षा समितीच्या वतीने आयोजित ‘जागर हिंदु शक्तीचा’ या जनजागृती सभेत २ ऑक्टोबर या दिवशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,

१. हिंदूंवर पूर्वी अत्याचार होत होते; कारण तेव्हा अफझलखानी वृत्तीचे सरकार होते. आता हिंदुत्वनिष्ठ सरकार असल्याने यापुढे हिंदूंवर अत्याचार सहन केले जाणार नाहीत.

२. आम्ही कोणत्या धर्माचा द्वेष करणार नाही; पण जर कुणी हिंदु समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल.

३. धर्मांतर, लव्ह जिहाद या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने विशेष पथकाचीही नेमणूक करावी.

४. एखादी घटना घडल्यावर आपण संघटित होतो, त्यापेक्षा आपण नियमितपणे एकत्र आले पाहिजे.

५. आपण उत्सव साजरे करतांना त्यातून धर्मशिक्षण देऊन धर्म समजून घेणे आवश्यक आहे.

चेंबूरमधील रूपाली चंदनशिवे या तरुणीची मुसलमान पतीकडून झालेली हत्या, नवी मुंबईमधील लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या वाढत्या घटना, सीवूड्समधील बेथेल गॉस्पेल संस्थेत फादरकडून मुलींवर झालेला अत्याचार, देशविघातक कृत्य करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून चाललेली देशविरोधी कृत्ये यांविषयी आणि नवी मुंबईतील हिंदु समाजावर सतत होत असलेल्या विविध आघातांच्या विरोधात या सभेत जागृती करण्यात आली.

‘जय भीम आर्मी’चे संस्थापक अध्यक्ष नितीन मोरे यांनी ‘रूपाली चंदनशिवे हिची हत्या करणार्‍याला लवकर शिक्षा मिळावी’, यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी केली. विश्व हिंदु परिषदेच्या महिला विभागाच्या उपाध्यक्षा सौ. मनीषा भोईर म्हणाल्या की, लव्ह जिहादच्या मागे धर्मांधांची मोठी साखळी आहे. करणी करून मुलींचे  वशीकरण केले जात आहे. यासाठी हिंदूंनी जागृत होऊन आपल्या मुलांवर धर्माचे संस्कार केले पाहिजेत. भाजप ‘आयटी सेल’चे महाराष्ट्र प्रदेश संयोजक सतीश निकम यांनी ‘बेथेल गॉस्पेल संस्थेतील आरोपी फादरवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली.

धर्मरक्षा समिती नवी मुंबईचे अध्यक्ष सुरेशसिंग राणा यांनी ‘बेथेल गॉस्पेल संस्थेचे वसतीगृह १० दिवसांत बंद न केल्यास आम्ही ते बंद करू’, अशी चेतावणी या वेळी दिली.

या वेळी मातंग चेतना परिषदेचे संतोष आडांगळे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रफ्फुल पिसाळ यांनीही मार्गदर्शन केले.