महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला धान खरेदी घोटाळा !
भंडारा – महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शासनाने खरेदी केलेले धान्य सापडलेच नाही. हे धान्य केवळ कागदावरच आहे. त्यामुळे ते शोधावे लागेल आणि ज्यांनी धान्य गायब केले, त्यांना धरावे लागेल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी येथे दिली. भंडारा दौर्याच्या वेळी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भंडारा येथे धान उत्पादक शेतकरी पुष्कळ प्रमाणात आहेत. या शेतकर्यांना बोनस मिळालाच पाहिजे. धान खरेदीमधील अनागोंदी कारभार दूर झालाच पाहिजे. शेतकर्यांचे धान खरेदी झालेच पाहिजे. शेतकर्यांच्या नावाने व्यापार्यांचेच धान खरेदी केले जाते, असे आता होऊ नये. शेतकर्यांशी केला जाणारा अप्रामाणिकपणा सहन करणार नाही. मागील सरकारच्या काळात ज्यांच्याकडे धान साठवणीची जागाही नाही, अशा अनेक बनावट संस्थांनी धान खरेदी केल्याचे दाखवले गेले. शेतकर्यांच्या नावाने दुसर्यानेच लाभ घेतला. हे आता रोखावे लागेल.
लवकरच धान खरेदीसाठी बाजारात येणार आहे. त्याच्या खरेदीची व्यवस्था करावी लागेल. शेतकर्यांना बोनस, तसेच चांगले साहाय्य मिळालेच पाहिजे. धानखरेदीही पारदर्शक होईल, यासाठी प्रयत्न करू. भंडारा हा पर्यटनाचा जिल्हा आहे आणि सिंचन खाते आता माझ्याकडे आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याचे सिंचन आणि पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न करू, असे फडणवीस यांनी सांगितले.