(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हा हिंदुत्वाचा ‘अजेंडा’ !’ – समाजवादी पक्ष (माओवादी)

दाऊद इब्राहिमविषयी सहानुभूती दाखवत माओवाद्यांकडून आतंकवाद्यांचे समर्थन !

मुंबई – देशविरोधी कारवाया करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्रशासनाने घातलेल्या बंदीला समाजवादी पक्षाने (माओवादी) मुसलमानविरोधी कारवाई दाखवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यासाठी जाहीररित्या प्रसिद्धीपत्रक काढून त्यामध्ये अप्रत्यक्षपणे दाऊद इब्राहिमविषयी सहानुभूती दाखवून आतंकवादाचेही समर्थन करण्यात आले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी म्हणजे ‘हिंदुत्वाचा अजेंडा’ असल्याचे फुत्कारही या प्रसिद्धीपत्रकात काढण्यात आले आहेत.

केंद्रशासनाच्या पुढाकाराने काही मासांपूर्वी आतंकवादी दाऊद इब्राहिम याची भारतासह विदेशातील मालमत्ता गोठवण्याची कारवाई आली. ‘मुसलमानांच्या संपत्तीला अवैध दाखवून सरकार ती कह्यात घेत आहे. बुलडोझरद्वारे मालमत्ता नष्ट केली जात आहे’, असे समाजवादी पक्षाकडून (माओवादी) काढण्यात आलेल्या या प्रसिद्धीपत्रकामध्ये  नमूद केले आहे. (दंगल करणार्‍या धर्मांधांनी बांधलेल्या अवैध घरांवर कारवाई झाली आहे, हे सर्वज्ञात आहे ! – संपादक)

या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या २५० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्या कुटुंबियांना कष्टदायक परिस्थितीत ठेवण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्ष मुसलमानांचा मतांसाठी उपयोग करून घेत आहेत. भारतात मुसलमान समाज अधिकच गरीब होत आहे. इस्लामी उग्रवादाच्या नावाखाली केंद्रशासन हिंदूंची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. (म्हणजे इस्लामी आतंकवादी आहेत, हे तरी मान्य केले आहे ! – संपादक) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदीला विरोध करण्यासाठी सर्व जनतावादी संघटनांनी एकत्र यावे. भाजप सत्तेत आल्यानंतर ‘इस्लामिक फोबिया’ला उकरून काढत आहे. आतंकवादी उग्रवादी कार्यक्रम राबवणे, देशातील शांतता बिघडवणे आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणे आदी तर्कांद्वारे ब्राह्मणी हिंदुत्वाच्या फॅसिस्टवादाला विरोध करणार्‍या शक्तींना दाबण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्यात आली आहे. (‘चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात’, ते यालाच ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • आतंकवादाचे उघडपणे समर्थन करणार्‍यांची सरकारने चौकशी करावी !
  • देशद्रोह्यांचे उघड उघड समर्थन करणारा समाजवादी पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते यांची कसून चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी !