ब्रह्मदेवांची कन्या आणि शब्दब्रह्माची उत्पत्ती म्हणजे श्री शारदादेवी !

30नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi

आज ३ ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘श्री सरस्वतीदेवी पूजन’ आहे. त्या निमित्ताने…

श्री शारदा देवी

आश्विन शुक्ल ७ हा दिवस श्री सरस्वतीदेवी पूजनाचा म्हणून भारतीय लोक पाळतात. श्री सरस्वती किंवा श्री शारदा ही विद्येची देवता मानली आहे. आश्विन शुक्ल ७ हा दिवस अत्यंत शुभ, सुमंगल आणि कल्याणकारी मानला गेला आहे. धरणीमातेला ‘सुजलाम् सुफलाम्’, असे स्वरूप देणारा वर्षाऋतू संपून सर्वत्र शांती, निर्मळता आणि प्रसन्नता नांदत असते. यांतच देवांना शारदेचे दर्शन झाले असावे. ‘सज्जन हृदयासारख्या सरोवरात विहार करणारी प्रसन्न कमळे आणि आकाशात अनंत काव्यांचे फवारे सोडणारा रसस्वामी चंद्र हे दोन्ही जेव्हा परस्परांचे ध्यान धरत होते, तेव्हा देवतांनी शारदेचे आवाहन केले. शारदा आली आणि वनश्रीचे वैभव विकसले. शारदा आली आणि घरोघर समृद्धी वाढली. शारदा आली आणि विणेचा झणत्कार चालू झाला. संगीत अन् नृत्य सर्वत्र पसरले.’

ज्या सरस्वतीचे पूजन आजपासून चालू होत असते, त्या देवीचे स्वरूप कसे आहे ? ती मंजुलहासिनी बाला नाही, मनोमोहिनी मुग्धा नाही, विलासचतुरा प्रौढा नाही, तर ती नित्ययौवना आणि स्नन्यदायिनी माता आहे. ती विश्वमाऊली आहे. वेदमाता, ब्रह्मसूता, मूलमाया अशी श्री शारदादेवी सकल चराचर सृष्टीची आदिजननी आहे. ती अतीसूक्ष्म, निर्विकल्प, शब्दातीत आणि स्फूर्तीरूप आहे. ब्रह्मनिष्ठ संत तिच्या स्वरूपी समाधिसुख भोगतात. निर्गुण, निराकार परब्रह्माच्या ठिकाणी ‘स एकाकी न रमते ।’ (महोपनिषद्, अध्याय १) म्हणजे ‘त्याला (ईश्वराला) एकट्याला करमत नसे.’ ‘एकोऽहं बहु स्याम् ।’ म्हणजे ‘मी एक आहे, आता मी अनंत रूपांत प्रकट होईन’, असे जे आदिस्फुरण झाले, तेच शारदेचे मूलस्वरूप आहे. त्यांनाच पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, गणेश-शारदा अशी नावे आहेत. एकत्व नष्ट न होता ही दोन रूपे झाली.

याच शारदेला समर्थांनी या शब्दांत नमन केले आहे. –

आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता ।
शब्दमूल वाग्देवता । माहं माया ।। – दासबोध, दशक १, समास ३, ओवी १

अर्थ : मी आता वेदांची जननी, ब्रह्मदेवांची कन्या, शब्दब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झाली, त्या वाग्देवतारूपी महामायेला, श्री शारदेला वंदन करतो.

श्री ज्ञानदेवांनीही हिचे स्वागत पुढीलप्रमाणे केले आहे,

आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी ।
ते श्री शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २१

अर्थ : आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य, वागर्थ आणि कला यांची देवता आहे; जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीला मी वंदन करतो.

(साभार : ‘दिनविशेष’)