पुण्यातील वानवडी येथील एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह बिशप आणि आर्च बिशप यांवर गुन्हा नोंद !

पुणे – एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वानवडी येथील एका शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह बिशप आणि आर्च बिशप यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२१ मध्ये पीडित मुलाच्या घरी घडली. अत्याचार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकावर आणि त्याची तक्रार केल्यानंतर कारवाई न केल्याविषयी पुण्यातील बिशप आणि मुंबईतील आर्च बिशप अशा तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या आई-वडिलांकडून सामाजिक कार्यकर्ते मारुति भापकर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

संबंधित मुख्याध्यापक मुलाच्या आई-वडिलांच्या ओळखीचे आहेत. घटनेच्या दिवशी ते मुलाच्या घरी आले. मुलाचे आई-वडील घरी होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते मुलाच्या खोलीमध्ये गेले आणि मुलाशी अश्लील चाळे केले. मुख्याध्यापक गेल्यानंतर मुलाने झालेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मुलाचे आई-वडील मुख्याध्यापकांकडे गेल्यावर मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘हो मी त्याच्याबरोबर गैरकृत्य केले आहे. त्याविषयी तुला काय करायचे आहे ते कर. मी कुणाला घाबरत नाही.’’ त्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकांची तक्रार पुणे आणि मुंबई येथील बिशपकडेही केली होती; मात्र त्याची नोंद घेतली नाही, असे तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकरणांवर वृत्तवाहिन्या कधी चर्चासत्र घेणार नाहीत, तसेच बुद्धीप्रामाण्यावादी आणि पुरो(अधो)गामीही काही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !