पैठण (जिल्हा संभाजीनगर) संतपिठात १५३ विद्यार्थ्यांचा प्रवेश !

अधिकच्या ५३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संमतीसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर !

संभाजीनगर – जिल्ह्यातील पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपिठातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी १५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेश प्रक्रियेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. संतपिठाची प्रवेशक्षमता १०० असतांना अधिकच्या ५३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संमतीसाठी संतपिठाने विद्यापीठ प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी नवीन प्रवेशप्रक्रिया २१ जून ते २१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पार पडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या अंतर्गत पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठ गेल्या वर्षीपासून चालू करण्यात आले आहे. या संतपिठात विविध ५ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्यात आले आहेत. यात तुकाराम गाथा ग्रंथ परिचय, श्री एकनाथी भागवत, श्री ज्ञानेश्‍वरी ग्रंथ परिचय, वारकरी संप्रदाय परिचय आणि महानुभाव संप्रदाय परिचय, या अभ्यासक्रमांचा, तसेच ६ मासांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे.