शक्तींची निर्मिती

सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…

कोणत्याही देवतेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती कळली, तर तिच्याविषयी श्रद्धा वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्‍यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २८ सप्टेंबर या दिवशी आपण ‘आद्याशक्ती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

१. एखाद्या देवाने निर्मिती करणे

अंधकासुर देवांना त्रास देत असे. एकदा तर त्याने शिवपत्नी पार्वतीचेच हरण केले. मग शिवाने त्याच्याशी युद्ध चालू केले. युद्धात अंधकासुराला होणार्‍या घावांतील (जखमांतील) रक्ताचा प्रत्येक थेंब भूमीवर पडला की, त्यातून नवीन अंधकासुर निर्माण होत. यामुळे देवसैन्य अडचणीत आले. तेव्हा शिवाने माहेश्वरी आणि एक प्रकारच्या मातृका निर्माण केल्या. त्यांनी अंधकासुराचे रक्तबिंदू भूमीवर पडण्याआधीच जिभेने प्यायला आरंभ केला. त्यामुळे नवीन अंधकासुर निर्माण व्हायचे थांबले. मग शिवाने त्याचा सहज वध केला (वराहपुराण २७ आणि सौरपुराण २९ यांनुसार).

२. देवांच्या शक्तींच्या एकत्रिकरणाने निर्मिती होणे

अ. ‘एकदा महिषासुर नावाचा दैत्य महाबली बनला. त्याने देवांशी युद्ध चालू केले. इंद्राचा पराभव करून तो स्वतः इंद्र बनला. मग सर्व देव ब्रह्मदेवाला पुढे करून श्रीविष्णु आणि शंकर यांच्याकडे गेले. महिषासुराचा वृत्तांत ऐकून त्या दोघांच्या आणि अन्य देवांच्याही भुवया वक्र झाल्या. लगेच त्या दोघांच्या आणि अन्य देवांच्याही शरिरांतून तेजाचा झोत बाहेर पडला. ते सर्व तेज पुंजीभूत होऊन त्यातून एक देवी उत्पन्न झाली. तीच महालक्ष्मी होय. देवांनी तिची स्तुती केली, तिला आपापली शस्त्रे दिली आणि महिषासुराचा वध करण्याविषयी प्रार्थिले.’

आ. ‘श्री दुर्गादेवीची अवयवनिर्मिती कशी झाली, त्याचे वर्णन मार्कंडेयपुराणात दिले आहे, ते असे – शंकराच्या तेजाने दुर्गादेवीचे मुख उत्पन्न झाले. यमाच्या तेजाने तिच्या डोक्यावर केस निर्माण झाले. श्रीविष्णूच्या तेजाने हात, चंद्राच्या तेजाने स्तन, इंद्राच्या तेजाने कटिभाग, वरुणाच्या तेजाने जांघा आणि पिंढर्‍या (पोटर्‍या), भूमीच्या तेजाने नितंब, ब्रह्माच्या तेजाने पाय, सूर्यतेजाने पादांगुली, वसूंच्या तेजाने करांगुली, कुबेरतेजाने नासिका, प्राजापत्यतेजाने दात, अग्नीतेजाने तीन डोळे, सांध्यतेजाने भुवया अन् वायुतेजाने कान निर्माण झाले. तसेच अन्य समस्त देवांचे तेजही तिच्या रूपयोजनेच्या कामी उपयोगी पडले.’ या देवतेला प्रत्येक देवाने एकेक आयुधही दिले, उदा. शिवाने त्रिशूळ, श्रीविष्णूने चक्र, इंद्राने वज्र आणि काळदेवतेने खड्ग दिले. अशा प्रकारे वीस आयुधांनी देवी सज्ज झाली.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’)