अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घाला !

नवी मुंबईत अभाविपची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई, २६ सप्टेंबर (वार्ता.) – नवी मुंबईत अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्याची मागणी अभाविपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फडणवीस वाशी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात अभाविपच्या जिल्हा संयोजिका प्राची सिंह यांनी म्हटले आहे की, नवी मुंबईत अमली पदार्थाचे सेवन आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. यांमध्ये चोर्‍या, मारामार्‍या, अपहरण, अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नवी मुंबईतील विविध ठिकाणी अमली पदार्थांची विक्री उघडपणे केली जात आहे, असा आरोप प्राची सिंह यांनी केला आहे.

शाईची बाटली, पेनाची रिफिल अशा विविध वस्तूंच्या माध्यमातूनही या पदार्थांची विक्री केली जात आहे. ६ वी ते १० वी या वयोगटातील विद्यार्थ्यांनाही यामध्ये लक्ष्य करण्यात आले आहे. या पदार्थांच्या सेवनामध्ये मुलींचे प्रमाण ६० टक्के असल्याचे दिसून आले आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले विद्यार्थी आणि तरुण घरातील पैसे चोरणे, भ्रमणभाष चोरणे अशा गुन्ह्यांच्या माध्यमातून अमली पदार्थांची खरेदी करत आहेत.

तरुण पिढीला व्यसनाधिनतेपासून वाचवण्यासाठी याला आळा घालण्याची आवश्यकता आहे. यासाठी संबंधित यंत्रणांना अमली पदार्थ विक्री करणारे आणि ते सेवन करणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • मुळात अशी मागणी करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? उघडपणे अमली पदार्थांची विक्री होते, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे !
  • तात्पुरत्या सुखासाठी व्यसनाच्या आहारी जाणार्‍या तरुणांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !