पाकच्या महिला मंत्र्याच्या विरोधात लंडनच्या रस्त्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून ‘चोर चोर’ म्हणत घोषणाबाजी

लंडन (ब्रिटन) – पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना येथे पाकिस्तानी नागरिकांकडून विरोध करण्यात आला. येथील एका कॉफी शॉपमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या. या घोषणाबाजीनंतर लंडनच्या रस्त्यावर काहींनी त्यांचा पाठलाग केला. ‘पाकमधून लुटलेले पैसे घेऊन मरियम लंडनमध्ये फिरत आहेत’, असा आरोप या वेळी या समर्थकांनी केला.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात मरियम औरंगजेब शांत असल्याचे दिसत आहेत. त्या म्हणत आहेत, ‘तुमच्या आई-बहिणीची जर रस्त्यावर अशाप्रकारे कुणी हेटाळणी केली, तर समाजात काय संदेश जाईल ? हा विरोध करण्याचा मार्ग असू शकत नाही. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विरोध करायचा असल्यास तो तुम्ही मतदानाद्वारे करू शकता’, असा सल्ला मरियम यांनी इम्रान खान यांच्या समर्थकांना दिला.