साधकांवर कृपावर्षाव करणारी आणि साधनेसाठी आश्वस्त करणारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वात्सल्यदृष्टी !

कृपादृष्टी साधका उभारी देई । वात्सल्याने गुरुचरणी प्रीतीधागा गुंफला जाई ।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वात्सल्य पाहून मन भरून येणे

६.१०.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस होता. त्या वेळी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या सेवा करतात, त्या कक्षात जमलो होतो. दरवाजा उघडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई खोलीमध्ये आल्या. त्यांचे ते प्रेमळ रूप, ती माया आणि ते वात्सल्य पाहून माझे मन भरून आले. ‘जसे लेकरू आपल्या आईला बिलगते, तसे त्यांना पाहून त्यांच्या कुशीत जावे’, असे मला वाटू लागले आणि ते काही क्षणांतच अनुभवतासुद्धा येऊ लागले.’ – सौ. तन्वी सरमळकर, तिस्क, फोंडा, गोवा.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चेहर्‍यावर मातृत्व जाणवणे

६.१०.२०२१ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चेहर्‍यावर साधकांप्रती अत्यंत प्रेम आणि मातृत्व ओसंडून वहात होते. त्या आमच्याशी बोलत असतांना ‘त्यांची दृष्टी केवळ आमच्याशी बोलत नसून सनातन संस्थेच्या सर्व साधकांशी बोलत आहे’, असे मला वाटत होते. ‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे सर्वच साधकांचे प्रयत्न व्हावेत आणि त्यासाठी साधकांना साहाय्य करण्याकरता मी सदैव तुमच्यासह आहे’, असे त्यांच्या प्रत्येक दृष्टीक्षेपातून आणि त्यांच्या वाणीतून जाणवत होते. – सौ. कीर्ती जाधव, पाटणतळी, फोंडा, गोवा.

पूर्णाहुती झाल्यावर आरतीनंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सुवर्णाप्रमाणे तेजस्वी दिसणे

२४ ते २६ ऑक्टोबर २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सुदर्शन महायाग झाला. २६.१०.२०१९ या दिवशी पूर्णाहुतीनंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आरती केली. आरतीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई पुष्कळ तेजस्वी दिसत होत्या. आजवर रामनाथी आश्रमात झालेल्या अनेक यज्ञयागांपैकी या यागानंतर आरती करतांना त्या प्रथमच इतक्या तेजस्वी दिसल्या. आरती करून झाल्यानंतर आरती सर्वांनी ग्रहण करावी, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई हातातील आरतीचे तबक सर्वांना दाखवत होत्या. त्या वेळी आरतीतील सर्व दिव्यांच्या ज्योती सोन्यासारख्या पिवळ्या धमक दिसत होत्या. त्या ज्योती नेहमीपेक्षा अधिक मोठ्याही दिसत होत्या. त्या ज्योतींना पाहून वाटले, ‘ज्योतींनाही सर्व साधकांना शक्ती आणि चैतन्य देण्याची तीव्र आस आहे. त्यामुळेच त्या मोठ्या आणि तेजस्वी दिसत आहेत.’ पंचारती पितळ्याची असल्याने ती तेजस्वी दिसत होती. पंचारती ज्या तबकात होती, ते तबकही सुवर्णाप्रमाणे चमकत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईही सुवर्णाप्रमाणे पिवळ्या धमक दिसत होत्या. त्या वेळी वाटले, ‘प्रत्यक्ष देवीच आरतीच्या माध्यमातून चैतन्याची उधळण करत आहे.’ – कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०१९)

आरतीच्या ज्योती आणि सद्गुरूंच्या कृपावत्सल
नेत्रज्योती यांचे दर्शन घेण्याचा अलौकिक क्षण !

साधक आरती ग्रहण करत असतांना त्यांच्याकडे कृपाळू दृष्टीने पहातांना डावीकडून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (जुलै २०२२)

‘सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अनेक यज्ञ आणि पूजाविधी होत असतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे ईश्वरी राज्याची अनुभूती देणार्‍या सनातनच्या आश्रमात होणारे यज्ञही तितकेच अलौकिक असतात. या यज्ञविधींमध्ये सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचाही सहभाग असतो. यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति यांच्या भावपूर्ण, परिपूर्ण अन् श्रद्धायुक्त कृती अनुभवणे, ही साधकांसाठी साधनेची एक अत्युच्च शिकवण असते. पूजन करतांना त्यांच्या मुखावर प्रकटणारे भाव असे असतात की, समोर मूर्ती किंवा प्रतिमा नसून साक्षात् ती देवताच अवतरली आहे. पूजन कसे करावे ? याचा आदर्श वस्तूपाठच त्यांनी स्वतःच्या कृतीद्वारे साधकांसमोर ठेवला आहे. श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति या समष्टी गुरु असल्यामुळे केवळ पूजाविधी भावपूर्ण करून न थांबता त्याचा समष्टीला अधिकाधिक लाभ होण्यासाठीही प्रयत्नरत असतात. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यानंतर आरती केली जाते. आरती सर्वांनी ग्रहण करावी, यासाठी त्या जेव्हा सर्वांसमोर आरतीचे तबक धरतात, तो प्रसंग विलक्षण असतो. त्यांनी आरती ग्रहण करण्यासाठी तबक समोर धरलेले असल्यामुळे साधक निरांजनांकडे पाहून आरती ग्रहण करतात. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति इतक्या वात्सल्यमय दृष्टीने साधकांकडे पहात असतात की, निरांजनांकडे पहावे कि श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति यांच्या दृष्टीतील ते आत्यंतिक वात्सल्य, प्रीती, कृपा अनुभवावी, अशी त्यांची द्विधा मनःस्थिती होते. आरतीतून यज्ञाचे चैतन्य लाभते, तर गुरूंच्या दृष्टीतून साधकाचे मन आश्वस्त होते ! आरतीच्या ज्योती आणि गुरूंच्या नेत्रज्योती अशा दोन्हींचे दर्शन घेण्याचा तो अलौकिक क्षण असतो !’

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.९.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक