रशिया-युक्रेन युद्धावर तोडग्यासाठी मोदी, पोप आणि गुटेरेस यांची समिती नेमा : मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांना प्रस्ताव

न्यूयॉर्क (अमेरिका) –  रशिया-युक्रेन युद्धावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी समिती नेमावी आणि त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटेनियो गुटेरेस यांचा समावेश करावा, असा प्रस्ताव मॅक्सिकोने दिला आहे.

हे युद्ध थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही मॅक्सिकोने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेन युद्धावर चर्चा झाली. या वेळी मॅक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो लुईस एबरार्ड कासाबॉन यांनी त्यांच्या अध्यक्षांच्या वतीने  मध्यस्थ समितीचा प्रस्ताव मांडला. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये मध्यस्थीसाठी संयुक्त राष्ट्रांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्‍वासनही मेक्सिकोच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले.

तेलपुरवठा थांबवण्याची  रशियाची चेतावणी

जी-७ देशांनी प्रस्तावित केलेली किंमतमर्यादा योग्य नसेल, तर जागतिक बाजारपेठेला करण्यात येणारा तेलपुरवठा थांबवण्याची चेतावणी रशियाने नुकतीच दिली. ‘तेलाच्या किमती अयोग्य आहेत’, असे वाटल्यास याविषयी अमेरिकेला पाठिंबा देणार्‍या देशांचाही तेलपुरवठा थांबवू’, अशी चेतावणी रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी दिली आहे.