निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ६०
‘अनेक जण सायंकाळच्या वेळेत चहा आणि फराळ करतात. फराळामध्ये शेव, चिवडा, फरसाण यांसारखे तळलेले पदार्थ खातात. खरेतर या सायंकाळच्या चहा-फराळाची शरिराला थोडीसुद्धा आवश्यकता नसते, तरीही बहुतेक जण केवळ घरी हे पदार्थ आणून ठेवलेले किंवा उपलब्ध आहेत म्हणून खातात. शेव, चिवडा यांसारखे पदार्थ वर्षातून एकदा खाण्यासारखे आहेत; पण आजकाल उपलब्ध आहेत, म्हणून हे पदार्थ प्रतिदिन खाल्ले जातात. मनावर थोडेसे नियंत्रण ठेवून प्रतिदिन सायंकाळी करण्यात येणारा चहा-फराळ सोडून तर पहा ! सायंकाळच्या वेळी चहा प्यायला नाही, म्हणून फारतर २ – ३ दिवस डोकेदुखीच तेवढी काय ती होईल; परंतु प्रतिदिनचा चहा-फराळ सोडला, तर तुम्ही निरोगी जीवनाच्या दिशेने निश्चितच एक पाऊल पुढे टाकलेले असेल. चहा-फराळ सोडल्याने होणारी डोकेदुखी किंवा पोटात पडणारी आग शमवण्यासाठीही सोपे उपाय आहेत. हे उपाय आगामी चौकटींमध्ये येतीलच. त्यामुळे प्रतिदिन प्रकाशित होणार्या या चौकटी वाचा आणि आचरणात आणा ! जे कष्टाची कामे करतात, त्यांनी ३ वेळा आहार घेतला, तरी चालतो; परंतु जे बैठी कामे करतात, त्यांनी २ वेळाच आहार घ्यायला हवा. यापेक्षा अधिक वेळा खाल्ल्यास ते आरोग्य बिघडवण्यास कारण ठरते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२२)