अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण- अकराव्या आरोपीला मुंबई येथे अटक !

उमेश कोल्हे

अमरावती – शहरातील पशूवैद्यक व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए’ने) २१ सप्टेंबर या दिवशी मुंबई येथे अकराव्या आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीवर ‘एन्.आय.ए’ने ८ दिवसांपूर्वीच २ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते. शहीम उपाख्य शईम उपाख्य मोनू अहमद फिरोज अहमद असे आरोपीचे नाव आहे. शहीम अहमद याने मुंबई येथील ‘एन्.आय.ए’च्या न्यायालयात शरणागती पत्करली. यापूर्वी ‘एन्.आय.ए’ने २ जुलै, तसेच २ आणि ११ ऑगस्ट या दिवशी आरोपींना अटक केली होती. शहीम याला न्यायालयात २२ सप्टेंबर या दिवशी उपस्थित करण्यात आले होते. त्याला १० दिवसांची एन्.आय.ए. कोठडी देण्यात आली आहे.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २ जुलै या दिवशी या प्रकरणाचे अन्वेषण शहर पोलिसांकडून ‘एन्.आय.ए’कडे वर्ग झाले होते. परिसरातील विविध सीसीटीव्ही चित्रण पाहून आरोपींचा शोध घेण्यास प्रारंभ करण्यात आला होता. सध्या अटक केलेला आरोपी शहर पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातच निष्पन्न झाला होता; मात्र तेव्हापासून तो पसार होता. त्यानंतर त्याच्या शोधात ‘एन्.आय.ए’चे पथक २-३ वेळा शहरात आले होते; मात्र तो सापडला नव्हता. पोलीस त्याच्या मागावर होते.