नागपूर येथील हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नागपूर, २० सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, तेलंगाणाचे आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याची धमकी देणार्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण होण्यासाठी त्यांना कारागृहातून मुक्त करावे, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने येथील संविधान चौक येथे नुकतेच हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. नमिता काकडे यांनी ‘लव्ह जिहाद’चे भयानक वास्तव उपस्थितांसमोर मांडले. हिंदु जनजागृती समितीचे अतुल अर्वेनला, राष्ट्रीय युवा गठबंधनचे सभापती राहुल पांडे, धर्मप्रेमी रामकुमार मिश्रा, कामठी येथील हिंदु जागरण मंचाचे संयोजक बंटी पिल्ले, मीडिया सेलचे संयोजक चंदन वर्णम आदी आंदोलनात उपस्थित होते. शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजया बनकर यांना निवेदन देण्यात आले.
क्षणचित्र : ‘आंदोलनाचा विषय अतिशय गंभीर आहे. अशा विषयावर कुणीही आंदोलन करत नाही. केवळ हिंदु जनजागृती समितीच हे कार्य करत आहे. हे पाहून पुष्कळ चांगले वाटते. आंदोलनाच्या माध्यमातून असे विषय पुढे आले पाहिजेत आणि समाज जागृत झाला पाहिजे’, असे मनोगत धर्मप्रेमींनी व्यक्त केले.