इराणमधील महिलांचे हिजाब हटवून सरकारविरोधी आंदोलन !

हिजाब न घातल्याने अटक केल्यानंतर मृत पावलेल्या इराणमधील तरुणीचे प्रकरण

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

तेहरान (इराण) – पश्‍चिम इराणमधील साकेझ शहरात १७ सप्टेंबर या दिवशी महिलांनी हिजाब हटवून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी हिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमधील महिला आक्रमक झाल्या आहेत. हिजाब हटवून करण्यात आलेल्या या आंदोलनाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. इराणमध्ये महिलांना हिजाब अनिवार्य आहे. हिजाब हटवणे हा इराणमध्ये दंडनीय गुन्हा आहे.

काय आहे प्रकरण ?

हिजाब न घातल्याने पोलिसांनी महसा अमिनी नावाच्या २२ वर्षीय तरुणीला १३ सप्टेंबर या दिवशी अटक केली होती; परंतु ३ दिवसांनी कारागृहात बेशुद्ध पडल्याने रुग्णालयात नेत असतांना तिचा मृत्यू झाला. महसा तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तेहरानला आली होती. अटक झाल्यानंतर काही घंट्यांतच अमिनी कोमात गेली. तिला रुग्णालयात नेण्यात आले; पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, महसाला कोणताही आजार नव्हता. तिचा मृत्यू संशयास्पद आहे. महसाला मारहाण केली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.