सामाजिक भान विसरलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

भारतीय चित्रपट जगतामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला विशेष महत्त्व आहे. श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्व स्तरांतील नागरिकांच्या मनावर हिंदी चित्रपटसृष्टीने अधिराज्य गाजवले आहे. ‘मनोरंजन’ हा चित्रपटाचा हेतू असला, तरी समाजाला दिशा देण्याची उद्दात्त कामगिरी चित्रपटांनी केली आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. वर्ष १९७१ च्या पाकिस्तानच्या आक्रमणाची दाहकता आणि तत्कालीन भारतीय सैनिकांनी दाखवलेले अफाट शौर्य हे पुस्तकरूपाने जेवढे भारतियांपर्यंत पोचले नाही, ते ‘बॉर्डर’ या एका चित्रपटाद्वारे पोचले. या चित्रपटातून भारतियांमध्ये सैनिकांची वीरश्री पोचली, राष्ट्राभिमान जागृत झाला. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने भारतासह विदेशामध्ये भारताच्या थोर जीवनमूल्यांचे दर्शन घडवून समाजापुढे आदर्श निर्माण केला. अनेकांनी या मालिकेतून नैतिक मूल्यांचा अंगीकार करून जीवनाचे सार्थक करून घेतले. चित्रपट किंवा मालिका समाजाला कशा प्रकारे दिशादर्शक ठरू शकतात, याची ही उत्तम उदाहरणे आहेत. हिंदी चित्रपटांनीही प्रारंभीच्या काळात समाजाला दिशा दिली. चारित्र्यकथा, ऐतिहासिक कथा या मूल्याधिष्ठित विचारांवर असतात. प्रेमकथा आणि गुन्हेगारी जगत यांवर चित्रपट करतांनाही हिंदी चित्रपटसृष्टीने त्यातून समाजाला योग्य संदेश दिला आहे; परंतु १९८०-१९९० च्या दशकापर्यंत सामाजिक भान राहिलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीची त्यानंतरची वाटचाल मात्र अनैतिकतेकडे होऊ लागली. अभिनय, कथा यांपेक्षा हिंदी चित्रपटसृष्टी अश्लीलता, भडकपणा आणि व्यावसायिकता यांच्या आहारी गेली आहे.

वर्ष २०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीतून हिंदी चित्रपटसृष्टीचे अमली पदार्थांशी असलेले संबंध समाजापुढे आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील नवोदित कलाकारही ‘ड्रग्ज’च्या आहारी गेल्याचे या चौकशीत उघड झाले. चित्रपटाने किती कोटी रुपयांची कमाई केली, याची वृत्ते सध्या वर्तमानपत्रात येतात आणि त्यावरून चित्रपट किती यशस्वी झाला, हे ठरवले जाते. थोडक्यात चित्रपटाच्या कमाईवरून त्याच्या यशस्वीतेचे मोजमाप होते. सध्या व्यावसायिक युगात हे होणे स्वाभाविक आहे; परंतु चित्रपटात ज्याप्रमाणे अश्लीलता, व्यभिचार किंवा व्यसनाधीनता बळावली आहे, ते पहाता हिंदी चित्रपटसृष्टी आता नैतिकतेने काम करणार्‍यांची राहिलेली नाही, हेच लक्षात येते.

गल्लाभरू चित्रपटसृष्टी !

चित्रपटातील अभिनेते आणि अभिनेत्री यांनी केलेल्या ‘स्टाईल’चे अनुकरण युवापिढी करते. काही मासांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील अभिनेत्याच्या दाढीवरून हात फिरवण्याच्या ‘स्टाईल’चे अनुकरण लाखो तरुणांनी केले. अगदी लहान मुलेही ती ‘स्टाईल’ सर्रास करून दाखवत होती. ‘द कश्मीर फाईल्स’सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांवर धर्मांध मुसलमानांनी केलेले अनन्वित अत्याचार देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोचले. यातूनच समाजमनावरील चित्रपटसृष्टीचा पगडा दिसून येतो. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि कलाकार यांनी सामाजिक भान ठेवायला हवे. चित्रपटातील दृश्यांचा कोणताही समाजविघातक परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. सध्याच्या चित्रपटांतील अश्लीलता, व्यभिचार, भडक आणि हिंसक दृश्ये पहाता चित्रपटनिर्मिती गल्लाभरू झाल्याचे दिसून येते.

समाजभान जोपासावे !

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी इंग्लंडमध्ये जाऊन चित्रपटनिर्मितीची कला शिकून वर्ष १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मूकपट सिद्ध केला. दादासाहेब फाळके यांनी त्यानंतर अनेक दर्जेदार चित्रपट केले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी समाजाला सामाजिक कर्तव्याचा मार्ग दाखवला. त्यानंतर व्ही. शांताराम, राज कपूर आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये भालजी पेंढारकर यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. या सर्वांनीच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटांच्या कथानकात लोककल्याणाचा गाभा होता. ‘बंदिनी’, ‘सरस्वतीचंद्र’ आदी प्रेमकथांवर आधारित असलेल्या चित्रपटांमधूनही भारतीय महिलांचा आदर्श उभा करण्यात आला आहे. राज कपूर यांनीही प्रेमकथांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली; परंतु त्यामध्ये व्यभिचार नव्हता. सध्या हिंदी चित्रपटांमध्ये अनैतिक संबंध दाखवणे हे सर्वसाधारण झाले आहे. महिलांचे अंगप्रदर्शन करून गल्ला भरणार्‍या सध्याच्या चित्रपटनिर्मात्यांची कीव करावीशी वाटते. पदरमोड करून निर्माण होणार्‍या चित्रपटांचे गल्ले आता कोटींच्या घरात गेले आहेत. किती कोटीचे मानधन मिळणार ? यावरून चित्रपटातील कलाकार ठरू लागले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीला शिखरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍यांचीही आता दुसरी किंवा तिसरी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘वाडवडिलांनी दिलेला वारसा टिकवता आला नाही, तरी त्यांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम केले नाही म्हणजे झाले’, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. ‘मी गोमांस खातो’, असे उघडपणे सांगणारे रणबीर कपूर असो वा चित्रपटांतून सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आमीर खान यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाला विरोध झाल्यावर ‘ज्यांना चित्रपट पहायचा नाही, त्यांनी पाहू नये’, असे मग्रूरपणे उत्तर देणार्‍या अभिनेत्री करिना कपूर-खान असो. या कलाकारांना ज्या सर्वसामान्यांनी यशाच्या शिखरावर पोचवले, त्यांच्या भावनांची कदरच नाही. मग अशा कलाकारांचे चित्रपट नागरिकांनी स्वत:चे पैसे खर्च करून का पहावेत ? याचा सर्वसामान्यांनीच आता गांभीर्याने विचार करावा. समाजभान जोपासत चित्रपटनिर्मिती आणि अभिनय यांची योग्य सांगड घातली गेली, तर चित्रपट हे समाजाला दिशा देणारे उत्तम माध्यम ठरू शकते, यात शंका नाही !

अश्लीलता आणि गुन्हेगारी यांचे उदात्तीकरण करणारे चित्रपट ‘सेन्सॉर बोर्डा’ला कसे चालतात ?