सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले; पण घरातील धार्मिक वातावरण आणि बालपणापासून देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे ते निर्भयतेने या प्रसंगांना सामोरे गेले. वर्ष १९९७ मध्ये ते साधनेत आले. गुरूंवरील अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन ३.६.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. गुरुकृपेने तीव्र प्रारब्धही न्यून होते, याचीही त्यांनी अनुभूती घेतली. ‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचा हा साधनाप्रवास साधकांना साधनेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

मागील भागात आपण पू. कुलकर्णीकाका यांनी केलेल्या काही सेवा आणि त्यांना झालेली संतपदाची प्राप्ती हा भाग पाहिला. आजच्या या ६ व्या भागात आपण त्यांनी हाताळलेले महत्त्वाचे न्यायालयीन खटले पहाणार आहोत.                                         

 (भाग ६)

भाग ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/612963.html


(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

गुरुकृपेने पार पडलेले न्यायालयातील महत्त्वाचे खटले !

१. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने श्री गणेशमूर्तींविषयी दाखल केलेली धर्मविरोधी याचिका !

१ अ. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धर्मद्रोही मागण्या ! : ‘वर्ष २०१२ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचा जळगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा (यापुढे ‘अंनिस’चा असा उल्लेख केला आहे.) एक कार्यकर्ता यांनी संभाजीनगरच्या खंडपिठात एक याचिका प्रविष्ट केली होती. आम्ही दाभोलकरांच्या याचिकेचे कागदपत्र मिळवले. त्या याचिकेत त्यांनी ‘सार्वजनिक गणपतीची मूर्ती ४ ते ६ इंच असावी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घालावी आणि श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करू नये’, अशा मागण्या केल्या होत्या. एकूणच ‘सार्वजनिक गणेशोत्सव बंद व्हावा’, अशाच प्रकारच्या मागण्या त्यांनी या याचिकेत केल्या होत्या.

(‘अंधतेने हिंदूंच्याच श्रद्धेचे निर्मूलन करण्यास प्रयत्नरत असलेल्या ‘(अंध)श्रद्धा निर्मूलन समिती’कडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार ?’ – संकलक)

१ आ. हिंदु जनजागृती समितीला प्रतिवादी करून घेऊन अंनिसच्या याचिकेवर आक्षेप घेणे : श्री गणेशमूर्ती पेण आणि कोकण येथे बनवण्यात येतात; म्हणजे अंनिसने जनहित याचिका संभाजीनगर ऐवजी मुंबईत दाखल करायला पाहिजे होती; परंतु ‘कधीतरी याचिका सादर करायची, ती प्रलंबित ठेवायची, मग पुन्हा ती स्वतःच्या सोयीने घ्यायची’, असाही हा अंनिसचा (खोडसाळपणाचा) प्रकार असू शकतो. या याचिकेत निवेदित केलेला विषय न्यायालयीन कक्षेबाहेरील होता, उदा. ‘श्री गणेशमूर्ती केवढ्या आकाराची असावी आणि ती कुठे विसर्जित करावी ?’, हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे ‘याचिका प्रदूषण मंडळाकडे न जाता थेट उच्च न्यायालयात कशी दाखल करण्यात आली ?’, अशी अनेक सूत्रे आम्ही खंडपिठासमोर मांडली. यात ‘हिंदु जनजागृती समितीला प्रतिवादी करून घेऊन आमचे म्हणणे ऐकावे’, अशी विनंती आम्ही खंडपिठाला केली.

१ इ. न्यायालयाने हिंदु जनजागृती समितीने मांडलेली सर्व सूत्रे स्वीकारणे : याचिका सुनावणीला घेण्यात आली. त्या वेळी गुरुकृपेने आमची (हिंदु जनजागृती समितीची) सर्व सूत्रे न्यायालयाने स्वीकारली. ‘अंनिसने याचिकेतील प्रदूषणाच्या संदर्भातील मांडलेल्या सर्व सूत्रांचा विचार महाराष्ट्र शासन आणि प्रदूषण मंडळ यांनी करावा’, अशा सूचना खंडपिठाने दिल्या, तसेच ‘गणेशमूर्ती ४ इंचांची असावी, ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीवर बंदी घालावी आणि मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन नको’, ही सूत्रे न्यायालयाने अमान्य केली.

१ ई. प्रसिद्धीमाध्यमांनी चुकीच्या वार्ता दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे आणि न्यायालयाने अंनिसच्या अधिवक्त्याला हा विषय वस्तूनिष्ठतेने सांगण्यास सांगणे : प्रसिद्धीमाध्यमांनी मात्र ‘न्यायालयाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर बंदी, सार्वजनिक गणपतीची मूर्ती ४ इंचांची असावी आणि वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नको, असे सांगितले आहे’, असे चुकीचे वृत्त दिले. ही वार्ता सर्वत्र पसरली. त्यामुळे मूर्तीकारांमध्ये भय निर्माण झाले. या वार्ता बघून न्यायालयही विस्मयचकित झाले. आम्ही ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्या वेळी अंनिसच्या (डॉ. दाभोलकरांच्या) अधिवक्त्याला न्यायालयाने या विषयी ‘प्रसिद्धीमाध्यमांना विषय वस्तूनिष्ठतेने (सत्य ते) सांगा’, असेही सांगितले.

१ उ. एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात अंनिसच्या प्रतिनिधीचे पितळ उघडे करून श्री गणेशमूर्तींच्या संदर्भातील अंनिसचा खोटा प्रचार थांबवणे : एका दूरचित्रवाहिनीवर या संदर्भात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात मला बोलायची संधी मिळाली. त्या चर्चासत्रात मी संभाजीनगर येथून आणि अंनिसचा प्रतिनिधी नाशिक येथून सहभागी झाला होता. अंनिसच्या प्रतिनिधीने तेथेही ‘न्यायालयाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वर बंदी घातली असून गणपतीची मूर्ती ४ इंचांची असावी आणि वहात्या पाण्यात गणपति विसर्जन करायचे नाही’, असे सांगितले आहे’, असेच सांगितले; पण गुरुकृपेने माझ्याकडे निकालपत्राची प्रत होती आणि मी प्रत्यक्ष प्रकरण (खटला) चालवले होते. मला बोलण्याची संधी मिळाल्यावर मी निकालपत्राची प्रत दाखवली आणि अंनिसचा खोटेपणा निदर्शनास आणून त्या प्रतिनिधीचे पितळ उघडे केले अन् अंनिसचा याविषयीचा खोटा प्रचार थांबवला.

१ ऊ. केवळ गुरुकृपेने या प्रकरणात यश मिळणे : माझी प्रसारमाध्यमांच्या समोर बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. मी बोलण्याआधी अनेक वेळा श्री गुरूंना शरण गेलो. केवळ गुरुकृपेने मला येथेही यश मिळाले. मला अनेक साधक साहाय्य करत होते. त्यांचा एकच भाव होता, ‘मी सनातनचा प्रतिनिधी आहे, तर माझे सादरीकरण चांगलेच व्हायला पाहिजे.’ साधकांचे कौतुक माझ्या लक्षात येत होते.

१ ए. अंनिसच्या खोट्या प्रचारामुळे मूर्तीकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणे, शिवसेनेने मूर्तीकारांचा मेळावा बोलवणे आणि गुरुकृपेने तिथे उपस्थित रहाण्याची संधी मिळणे : वर्ष २०१२ मध्ये अंनिसच्या या खोट्या प्रचारामुळे मूर्तीकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला; म्हणून शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी मूर्तीकारांचा मेळावा बोलावला. तेव्हा मी अन्य कारणाने मुंबईत होतो. पू. शिवाजी वटकरकाका मला म्हणाले, ‘‘चला, आपण शिवसेनाभवनला जाऊया आणि काय होत आहे ?’ ते पाहूया.’’ पू. वटकरकाका, मी आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर असे आम्ही तिघेजण तिकडे गेलो. पू. वटकरकाका मला म्हणाले, ‘‘तुमच्या नावाची चिठ्ठी देतो. संभाजीनगरला ज्या अधिवक्त्यांनी हा खटला जिंकला आहे, ते आले आहेत. आम्हाला भेटायची संधी मिळावी.’’ गुरुकृपा आणि पू. वटकरकाकांची तळमळ  यांमुळे श्री. उद्धव ठाकरे यांनी मला व्यासपिठावर बोलावले. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही विषय थेट मांडू शकता.’’ मी विषय मांडून सत्यकथन केले. त्यामुळे डॉ. दाभोलकरांचा खोटा आणि खोडसाळ प्रचार पुन्हा एकदा उघडकीस आला.

१ ऐ. ‘मागील अनेक जन्मांचे पुण्य फळाला आल्यामुळेच गुरुमाऊलीने जवळ केले’, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता वाटणे : गुरुमाऊली माझ्यावर किती कृपा करत होती ! माझ्यासाठी हे सर्व स्वप्नवत्च होते. यातून मला पू. वटकरकाकांमधील ‘गुरुकार्याची तळमळ’ हा गुण शिकायला मिळाला. अशा रितीने साधक माझ्या मनावर संस्कार करत होते. यासाठी प्रत्येक प्रसंगात माझ्याकडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘यालाच अनुसंधान म्हणतात का ? मी अशी कोणती सेवा किंवा लौकिक अर्थाने पराक्रम केला; म्हणून गुरुमाऊलीने मला जवळ केले आणि माझी आध्यात्मिक पातळीही घोषित केली ?’ , असे विचार माझ्या मनात येत होते. ही केवळ गुरुमाऊलीची कृपा आणि माझे अनेक जन्मांचे पुण्य यांचेच फळ होते.

या सर्व प्रसंगांत ‘आपला श्री गुरूंच्या चरणी शरणागतभाव आणि तळमळ पाहिजे’, हे मला शिकायला मिळून ‘गुरुकृपा कशी असते ? श्री गुरूंना शरण गेलो, तर काळ कसा अनुकूल होतो’, हे मला अनुभवता आले. यामुळे माझा श्री गुरूंप्रतीचा भाव वाढत गेला.’

२. तुळजापूर येथील श्री भवानीदेवी मंदिरातील (जवळजवळ १९ वर्षे चालू असणारा) अपहार !

२ अ. तुळजापूरच्या श्री भवानीदेवीच्या मंदिर न्यासाच्या मालकीचे सोने, चांदी, कोट्यवधींची रक्कम, तसेच भूमी यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी जनहित याचिका सादर करणे : ‘धर्मादाय अधिकार्‍यांनी ‘तुळजापूर मंदिर न्यासाच्या मालकीचे १२० किलो सोने, ४८० किलो चांदी, कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम मंदिराचे विश्वस्त, लिलावधारक आणि सरकारी कर्मचारी यांनी हडपली’, असा आरोप केला. याविषयी विधानसभेत १८ आमदारांनी प्रश्न विचारले. देवस्थानाची शेकडो एकर भूमी लोकांनी बळकावली. अपहार वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत झाला. वर्ष २०१० ते वर्ष २०१५ या काळातील ३ मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘‘उच्चपदस्थ अधिकारी आणि बडे राजकारणी यांत गुंतले आहेत; म्हणून अन्वेषण लवकर होत नाही.’’ यासंदर्भात साधकांनी ‘माहिती अधिकारा’तून मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मी (पू. सुरेश कुलकर्णी यांनी) अधिवक्ता उमेश भडगावकर यांच्या साहाय्याने वर्ष २०१५ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट केली.

२ आ. न्यायालयाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट पोलीस उपमहासंचालक यांना खटल्याच्या वेळी न्यायालयात उपस्थित रहायला सांगणे आणि त्यांनी ‘३ मासांत अहवाल सादर करतो’, असे न्यायालयाला सांगणे : न्यायालयाला हा विषय गंभीर वाटल्याने न्यायालयाने त्यात रुची दाखवली. न्यायालयाने चौकशी अहवाल मागवून त्याचा अभ्यास केला. तेव्हा न्यायालयाच्या निदर्शनास आले की, ‘पोलीस मुद्दामहून वेळकाढूपणाने चौकशी करत आहेत’; म्हणून न्यायालयाने थेट पोलीस उपमहासंचालक यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचा आदेश दिला. त्यानुसार ते न्यायालयात उपस्थित झाले आणि त्यांनी ‘३ मासांतच चौकशी करून अहवाल देतो’, असे सांगितले.

२ इ. अहवालाची एक प्रत हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्यांना देण्यास न्यायालयाने सांगणे : पोलीस उपमहासंचालकांनी न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानंतर न्यायालयाने ‘त्या अहवालाची एक प्रत हिंदु जनजागृती समितीचा अधिवक्ता असलेल्या मला (म्हणजे पू. सुरेश कुलकर्णी यांना) देण्यात यावी’, असा आदेश दिला.

श्री गुरूंच्या कृपेने मला अशा महत्त्वाच्या सेवा मिळाल्या आणि माझी क्षमता नसतांना त्यांनी माझ्याकडून करूनही घेतल्या.

(क्रमश:)

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संभाजीनगर. (३१.३.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग ७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/613670.html