संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास
पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले; पण घरातील धार्मिक वातावरण आणि बालपणापासून देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे ते निर्भयतेने या प्रसंगांना सामोरे गेले. वर्ष १९९७ मध्ये ते साधनेत आले. गुरूंवरील अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन ३.६.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. गुरुकृपेने तीव्र प्रारब्धही न्यून होते, याचीही त्यांनी अनुभूती घेतली. ‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचा हा साधनाप्रवास साधकांना साधनेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
मागील भागात आपण पू. कुलकर्णीकाका यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट आणि त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला भाव पाहिला. आताच्या या पाचव्या भागात त्यांनी केलेल्या काही सेवा आणि त्यांना झालेली संतपदाची प्राप्ती हा भाग पहाणार आहोत.
(भाग ५)
या लेखाचा भाग ४ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/612619.html |
२२. आतापर्यंत गुरुकृपेनेच जीवनदान मिळाल्याने उर्वरित आयुष्य धर्मकार्यासाठी अर्पण होण्यासाठी प्रार्थना करणे
२२ अ. अपघात होऊन स्नानगृहात पडणे आणि त्यातून गुरुकृपेने वाचणे : ‘मी एकादशीचा उपवास करतो. एकदा एकादशीला पहाटे ४ वाजता मी झोपेतून उठलो आणि स्वच्छतागृहात जातांना पडलो. मला पुष्कळ रक्तस्राव होऊ लागला. तेव्हा पत्नी, भाऊ आणि भाचा यांनी मला रुग्णालयात न्यायचे ठरवले. चारचाकीतून रुग्णालयात जात असतांना वाटेत मला उलटी झाली. त्यामुळे मला रुग्णालयात थेट अतीदक्षता विभागात भरती करावे लागले. तिथे मला उत्तम वैद्यकीय सेवा मिळाल्या. अनेकदा क्ष-किरण तपासणी आणि अन्य पडताळण्या झाल्या. मी बरा झालो. आश्चर्य म्हणजे त्यानंतर मला अतीदक्षता विभागातून दुसर्या कक्षात न ठेवता त्याच दिवशी घरी पाठवण्यात आले. पुढे काही दिवस मला विविध चाचण्या आणि नियमित पडताळणीसाठी रुग्णालयात जावे लागले. यातून मी केवळ गुरुकृपेनेच वाचलो.
२२ आ. प्रत्येक कठीण प्रसंगात गुरुकृपेने जीवनदान मिळाल्याने गुरूंप्रती कृतज्ञता दाटून येणे : माझ्या आयुष्यात असे अनेक अपघात किंवा अनेक कठीण प्रसंग घडले होते. त्यांतून मी गुरुकृपेनेच वाचलो होतो. त्या प्रत्येक वेळी माझ्या मनात पुष्कळ कृतज्ञता निर्माण व्हायची आणि मी देवाला प्रार्थना करायचो, ‘देवा, मला या सर्व प्रसंगांत मृत्यू आला असता; परंतु तू यांतून मला जीवनदान दिले आहेस. यासाठी हे गुरुदेवा, माझे उर्वरित आयुष्य धर्मकार्य, समष्टी साधना आणि तुमच्यासाठीच व्यय होऊ द्या.’ अशा प्रकारे माझ्यातील साधकत्व दृढ होत गेले.
२२ इ. अनेक जन्मांपासून साधकांचे रक्षण करत असलेल्या गुरुमाऊलींविषयी प्रचीती आल्याने त्यांच्याप्रती श्रद्धा दृढ होणे : महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून साधकांना सांगितले होते, ‘गुरुमाऊली साधकांच्या समवेतच असून ती मागील अनेक जन्मांपासून साधकांचे रक्षण करत आहे.’ याची मला पदोपदी प्रचीती आली. त्यामुळे गुरुकृपेने माझी गुरुदेवांच्या चरणांवरची श्रद्धा दृढ होत गेली.’
२३. अधिवक्त्यांना संपर्क करण्याच्या सेवेच्या निमित्ताने अनेक राज्यांचे दौरे करणे आणि साधक अन् संत यांचे भरभरून प्रेम अनुभवणे
‘वर्ष २०१० नंतर मला सेवेच्या निमित्ताने भारतातील अनेक राज्यांत फिरण्याचा योग आला. भारतातील सर्वत्रचे साधक आणि संत यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहून आम्ही भारावून जात होतो. त्यांच्याकडून मला ‘आनंदी राहून परिपूर्ण आणि आदर्श सेवा कशी करायची ? स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांसाठी प्रयत्न कसे करायचे ?’, हे शिकायला मिळाले. सद्गुरु, संत आणि उन्नत साधक यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे मागील अनेक वर्षांपासून मला पुष्कळ लाभ झाला. आता माझ्या आयुष्यात केवळ एकच ध्येय आहे, ते म्हणजे ‘गुरुमाऊलीला अपेक्षित अशी साधना करत सेवारत रहाणे !’
२४. सनातन संस्थेविषयी समाजात असलेला आदरभाव !
२४ अ. एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याने ‘आईचे दूध जसे शुद्ध असते, तसे सनातन संस्थेचे हिंदुत्व शुद्ध आहे !’, असे गौरवोद्गार काढणे : आम्ही संपर्कासाठी दौरे करत असतांना ‘हिंदुत्वनिष्ठांच्या मनात सनातन संस्था आणि साधक यांच्याविषयी किती आदर आहे !’, हे आम्हाला आढळून यायचे. त्यामुळे आमचे साधकत्व अजूनच दृढ व्हायचे. एका जिल्ह्यात एक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता आम्हाला म्हणाला, ‘‘सनातन संस्थेचे वर्णन करायचे, तर ‘सनातन म्हणजे शुद्ध हिंदुत्व !’ आईचे दूध जसे शुद्ध असते, तसे तुमचे हिंदुत्व शुद्ध आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे भेसळ (सरमिसळ) असलेले पिशवीतले दूध आहे.’’ हे उद्गार ऐकून ‘ही मंडळी सनातन संस्थेचा किती आदर करतात !’, हे लक्षात येऊन मला पुष्कळ आनंद झाला.
२५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला अपार कृतज्ञताभाव !
२५ अ. सेवेला जाण्यापूर्वी गुरुदेवांना भावपूर्ण प्रार्थना केल्यावर भावाश्रू येऊन पुष्कळ भावजागृती होणे : मी समष्टी सेवेसाठी बाहेर पडतांना गुरुमाऊलीला प्रार्थना करायचो. ‘गुरुमाऊली, ही समष्टी तुमचेच रूप आहे. मला समष्टी सेवा करतांना समष्टीत तुम्हाला पहाता येऊ दे. तुम्ही सतत माझ्यासमवेत रहा.’ गुरुमाऊलींना अशा प्रार्थना केल्यानंतर माझी अनेक मिनिटे भावजागृती व्हायची आणि मला भावाश्रू आवरत नसत. तेव्हा ‘मी गुरुचरणांवर भावाश्रूंचा अभिषेक केला आहे’, असे मला वाटायचे.
२५ आ. ‘गुरुदेवांचे प्रत्येक शब्द अन् वाक्य साक्षात् ब्रह्मवाक्य आहे’, असा दृढ विश्वास असणे : ‘गुरुदेवांनी सांगितलेला प्रत्येक शब्द अन् वाक्य हे साक्षात् ब्रह्मवाक्य आहे’, असा माझा दृढ विश्वास आहे. गुरुमाऊली आणि तिच्या प्रेरणेने सिद्ध झालेले सद्गुरु, संत अन् साधक यांचा आम्हाला सहवास लाभून त्यांचे आदर्श वागणे अनुभवता येते. यासाठी आम्ही साधक स्वतःला भाग्यवान समजतो. आम्हा साधकांचे अनेक जन्मांचे पुण्य असल्यामुळेच आम्हाला या गोष्टी अनुभवता येत आहेत.
२६. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून शिकायला मिळालेली सूत्रे
२६ अ. साधकांना साधनेसाठी सर्वार्थांनी मार्गदर्शन करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! : आरंभापासूनच मला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यास पुष्कळ आवडायचे. ‘त्यात दिलेले दृष्टीकोन, साधनेविषयीचे मार्गदर्शन आणि सांगितलेली प्रत्येक कृती अनुकरणीय आहे’, असे समजून मी ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असे. दैनिकाच्या माध्यमातून प्रतिदिन दिले जाणारे विचार आणि कृतीप्रवण होण्यासाठी दिलेले संदेश माझ्यासाठी ‘मार्गदर्शक तत्त्वे’च आहेत. उन्नत आणि साधक यांनी लिहिलेल्या लेखांनी ‘व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा कशा पद्धतीने करावी ?’, याचा आदर्शच माझ्यापुढे ठेवला आहे. हे सर्व मला साधनेत प्रगती होण्यासाठी उपयुक्त होते. दैनिकामुळे मला सेवा करण्याच्या अनेक संधी मिळत गेल्या.
२७. संतपदाची प्राप्ती !
२७ अ. गुरुदेवांच्या कृपेने वर्ष २०१९ मध्ये ‘आखिल भारतीय हिंदु अधिवेशना’त अधिवक्ता कुलकर्णी हे संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले जाणे : वर्ष २०१२ पासून प्रत्येक वर्षी गोव्यात होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’साठी मी उपस्थित रहात असे. वर्ष २०१९ मधील अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माझे आगगाडीचे परतीचे आरक्षण होते. अधिवेशनाची सांगता होण्याच्या एक दिवस आधी (२.६.२०१९ या दिवशी) मला तिकीट रहित करण्याचा निरोप मिळाला. त्यानुसार मी तिकीट रहित केले आणि दुसर्याच दिवशी, म्हणजे ३.६.२०१९ या दिवशी मी आणि बाळासाहेब (पू. सुधाकर चपळगावकर यांना) ‘संतपदी विराजमान’ झाल्याचे घोषित करण्यात आले.
२७ आ. संतपदप्राप्तीच्या वेळी केलेली कृतज्ञतापूर्ण प्रार्थना ! : तो दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा दिवस होता. त्या दिवशी माझ्याकडून गुरुमाऊलीच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होऊन प्रार्थना होत होती, ‘गुरुमाऊली, यापुढे माझा प्रत्येक श्वास, क्षण, विचार आणि सर्व उर्वरित आयुष्य सनातन संस्था, धर्मसेवा अन् धर्मकार्य यांसाठीच व्यय होऊ दे.’
२८. कोरोना महामारीच्या काळात धाकटी मुलगी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने कोरोनातून वाचणे
पू. बाळासाहेब चपळगावकर आणि मी संत घोषित झाल्यानंतर ६ मासांतच कोविड-१९ (कोरोना) हा दुर्धर रोग आला. या महामारीच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत माझे जवळचे मित्र अन् नातेवाईक यांचे कोरोनामुळे निधन झाले. आधुनिक वैद्या असणार्या माझ्या धाकट्या मुलीलाही कोरोना झाला; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ती वाचली.
२९. दैनिक ‘सनातन प्रभात’साठी प्रत्येक आठवड्याला जुन्या न्यायालयीन निवाड्यांविषयी लेख लिहिणे
२९ अ. कोरोनामुळे असलेल्या दळणवळण बंदीच्या वेळी घरी बसावे लागल्यावर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितल्याप्रमाणे न्यायालयीन निवाड्यांवर लेख लिहिण्याचे ठरवणे : कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी लागू झाल्यामुळे सर्वांनाच घरात बसावे लागले. सर्वत्र विविध बंधने आणि संचारबंदी (‘कर्फ्यू’) लागू झाली. त्या कालावधीत भारतातील प्रत्येक नागरिकाला घरी थांबावे लागले. मलाही ‘घरी बसून काय करायचे ?’, असा प्रश्न पडला. तेव्हा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.) यांनी मला सांगितले, ‘‘प्रतिदिन सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांचे जुने निवाडे वाचा अन् त्यांवर लेख लिहा.’’ हे माझ्यासाठी नवीनच होते. मी विचार केला ‘श्री गुरूंचा (परात्पर गुरु डॉक्टरांचा) संकल्प आहे, तर ‘हो’ म्हणूया.’ अशा प्रकारे मी लेख लिहिण्यास सिद्ध झालो.
२९ आ. लेख लिहिण्याच्या सेवेत साधकांकडून प्रेरणा आणि साहाय्य मिळणे : गुरुकृपा आणि सहसाधकांनी दिलेली प्रेरणा यांमुळे मी सर्वोच्च न्यायालय अन् मुंबई उच्च न्यायालय यांचे धर्म अन् राष्ट्र यांविषयीचे निवाडे वाचत होतो. मला त्यासाठी अधिवक्ता उमेश भडगावकर यांचे अनमोल साहाय्य मिळाले. गुरुदेवांच्या कृपेने मी या २ वर्षांत शंभराहून अधिक निकालपत्रे वाचून त्यांवर लेख लिहिले. पूर्वी साधक लेखांचे टंकलेखन करत असत. मागील एक वर्षापासून मी स्वतः टंकलेखन करत आहे.
२९ इ. गुरुकृपेने लिखाण आणि भाषण करता येणे
२९ इ १. आयुष्यात कधीही लेख लिहिले नसतांना गुरुकृपा आणि सहसाधकांचे साहाय्य यांमुळे लेख लिहिता येणे : मला आयुष्यात पक्षकारांसाठी ‘रिट’ (उच्च अथवा सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेली) याचिका किंवा इतर काही याचिका करणे, यांव्यतिरिक्त इतर काही लिखाण करायची सवय नव्हती. त्यामुळे ‘लेख लिहिणे’, हे माझ्यासाठी पुष्कळ अवघड काम होते; पण प्रत्येक वेळी गुरुदेवच ‘मला आतून विषय सुचवतात, त्याविषयी लिखाण करण्याचा विचार माझ्या मनात घालतात’, हे मी अनुभवले आणि नंतर तेच ‘आवडले’, असा निरोप देऊन खाऊही पाठवतात. ही सर्व त्यांचीच कृपा आहे. अशा पद्धतीने जे मला कधीही शक्य झाले नसते, ते गुरुमाऊलीच्या कृपेने करता येत आहे.
२९ इ २. व्यासपिठावरून एक शब्दही बोलणे अशक्य असतांना गुरुकृपेने भाषणे करू शकणे : लिखाण करण्याप्रमाणेच व्यासपिठावर बसून किंवा पत्रकारांसमोर बोलणे, हे माझ्या दृष्टीने एक मोठे दिव्य होते. मला ही गोष्ट कधीही जमायची नाही. माझ्या हातात ध्वनीक्षेपक (माईक) आला की, मी थरथर कापायचो. काही बोलण्याऐवजी माझा गळा दाटून यायचा आणि मी भीतीने मोठ्या आवाजात काहीतरी बोलायचो; मात्र गुरुमाऊलीचा संकल्प, मार्गदर्शन अन् त्यांनी दिलेली प्रेरणा यांमुळे मी काही भाषणे करू शकलो.
३०. ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ ची अनुभूती घेणे
‘माझे कुटुंबीय सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत नाहीत. तरीही त्यांचे कल्याण, त्यांचा भार गुरुमाऊली वहाते’, ही माझी पहिल्यापासूनची श्रद्धा आहे. माझी धाकटी मुलगी राधिका आधुनिक वैद्य झाल्यावर लगेचच गुरुमाऊलीच्या कृपेने (अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामुळे) तिला वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर) म्हणून सिंधुदुर्ग येथे नोकरी मिळाली. तिथे तिच्यासाठी निवास, जेवण आणि अन्य व्यवस्था यांची सर्व सोय सनातनच्या साधकांनी केली. ही गुरुदेवांचीच कृपा आहे. यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
मुलगी नोकरीत रुजू होतांना मी प्रत्यक्ष तिथे जाऊ शकलो नाही; परंतु सप्तर्षी म्हणतात त्याप्रमाणे ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’, याचा अर्थ, ‘नित्य माझे चिंतन करणार्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.’ या उक्तीप्रमाणे गुरुदेवच आमची काळजी घेतात. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
३१. गुरुमाऊलीमुळेच कृतज्ञताभाव निर्माण होणे
गुरुमाऊलीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. ‘सर्व तीर्थे गुरुचरणी आहेत’, हे गुरुमाऊलीच्या कृपेने पुष्कळ वेळा मला अनुभवता आले. त्यांनीच माझ्यात कृतज्ञताभाव निर्माण केला. त्यामुळे दिवसातील अनेक वेळा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते. केवळ त्यांची कृपा आणि संकल्प यांमुळे ‘नामजप आणि सेवा कशी करायची ? प्रत्येक साधकाकडून त्याचे सद्गुण कसे आत्मसात करायचे ?’, हे मी शिकलो. अशा या परमदयाळू गुरुमाऊलीच्या चरणी कितीही वेळा शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश मधुसूदन कुलकर्णी, संभाजीनगर (३१.३.२०२२)
भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/613178.html |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |