६ घंट्यांत ९३ मि.मी. इतकी वर्षातील विक्रमी पावसाची नोंद
ठाणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) – सकाळपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, तसेच ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस पडला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. शहरातील रस्ते आणि नाले यांना नदीचे स्वरूप आले होते. ठाणे, मुंब्रा शहरातील काही रस्ते, बाजारपेठा येथे २ ते ३ फूट पाणी साचले. ठाणे, कळवा रेल्वे स्थानकांतही रुळांवर पाणी साचले. लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली.
१६ सप्टेंबरच्या सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत ९३ मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला. या वर्षातील एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस म्हणून आपत्ती विभागाने घोषित केले आहे. भातसा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी १.२५ मीटर दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील मुख्य नद्यांची पाणीपातळी वाढलेली असून काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे डोलवाहल, जांभूळपाडा, टिटवाळा येथील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या बारवी धारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणाचे सर्व दरवाजे ३ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बारवी नदीपात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. बारवी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने धरणमार्गाने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.