नाशिक येथे अतीवृष्टीमुळे मंदिरे पाण्याखाली !

गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर !

नाशिक – जिल्ह्यात सलग २ दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. देशातून येथे पूजेसाठी, तसेच पिंडदान करण्यासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होत आहे. नदीकिनार्‍यावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेची चेतावणी दिली आहे.

गंगापूर धरणातून ७ सहस्र ३८९ क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. दारणा, कडवा आणि पालखेड धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी, दारणा आणि कादवा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवावीत, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.