|
मुंबई – १० सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या शिवसेना-शिंदे गटातील मारामारीप्रकरणी दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. मारहाण झालेले शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ‘पोलिसांनी आमची बाजू ऐकली नाही’, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर शिंदे गटाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला गेला आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. मारामारीप्रकरणी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी २ वेळा गोळीबार केला होता. पोलिसांनी याची चौकशी चालू केली आहे. गोळीबार केल्याप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार, सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि १ पोलीस अधिकारी बचावला आहे; मात्र सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
२. शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेल्या वादाविषयी फेसबूक आणि ‘व्हॉट्सॲप’च्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलवणे यांना मारहाण केली होती.
३. तेलवणे यांनी पोलिसांमध्ये प्रविष्ट केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्या वतीने भाविकांसाठी पाण्याचा कक्ष लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी शिवसेनेचे महेश सावंत यांनीही कक्ष लावला होता.
४. विसर्जनाच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास या २ गटांत वाद झाला होता. त्या वेळी हा वाद मिटवला; मात्र महेश सावंत यांनी रागातून २०-२५ कार्यकर्त्यांना घेऊन लाठ्याकाठ्यांसह मारहाण केली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संयम बाळगण्यास सांगितला आहे.