शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारे श्राद्ध करण्यास असमर्थ असलेल्या श्राद्धकर्त्याने निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्यांदा म्हणावे, ‘मी निर्धन आणि अन्नविरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा’, असे सांगितले आहे. केवळ असे केल्यास पितरांना श्राद्धाचे फळ कसे मिळते ? या विषयीचे शास्त्र जाणून घेऊया.
एक विद्वान : वरील शब्द अंतःस्थ तळमळीने उच्चारले असता, विश्वेदेवांची कृपा होऊन पितर त्या त्या योनीतून मुक्त होऊन पुढच्या गतीला प्राप्त होतात. यावरूनच कळकळीने केलेल्या प्रार्थनेचे महत्त्व लक्षात येते. प्रत्यक्ष कर्मकांडापेक्षा भावपूर्ण प्रार्थनेला अधिक महत्त्व आहे. भावपूर्ण प्रार्थनेने पितरगण, कनिष्ठ देवगण, इतर देवता प्रसन्न होऊन प्रार्थना करणार्या जिवाकडे आकृष्ट झाल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन पितरांना अल्प कालावधीत गती मिळून जिवाला श्राद्धादी कर्म केल्याचे फळ मिळते; म्हणून देवाच्या दारी अगतिक याचक होणे फार महत्त्वाचे असते. हात वर करून देवतांना आवाहन करून पितरांना उद्देशून प्रार्थना उच्चारणे, हे याचकाच्या अगतिक अवस्थेतून निर्माण झालेल्या भावाचे प्रतीक आहे. – एक विद्वान (सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, दुपारी २.१९)
(कळकळीची म्हणजेच भावपूर्ण प्रार्थना होण्यासाठी व्यक्तीत भाव असणे आवश्यक असते. सर्वसाधारण व्यक्तीत इतका भाव नसतो; म्हणूनच शास्त्रात श्राद्ध-विधी करण्याची आवश्यकता प्रतिपादिली आहे. – संकलक)
संदर्भ -सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’