१. भारतियांनी बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या विज्ञापनांना भुलून स्वदेशी दंतमंजन वापरणे बंद करून ‘पेस्ट’ (दंतधावन) वापरणे आणि पुढे पुन्हा त्याच आस्थापनांनी भारतीय पदार्थांचे विज्ञापन करणे
काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर एका बहुराष्ट्रीय आस्थापनाच्या दंतधावनचे (दात घासण्याच्या पेस्टचे) एक विज्ञापन प्रसिद्ध व्हायचे. त्यामध्ये सांगितले जायचे, ‘‘मीठ आणि कोळसा यांसारख्या कणीदार पदार्थांमुळे तुमच्या दातांची गुणवत्ता न्यून होते.’’ ते ऐकून आपण स्वतःचे चांगले दंतमंजन वापरणे बंद केले. त्या वेळी त्या आस्थापनाने मऊ पिठासारख्या पांढर्या शुभ्र दंतधावनची विक्री चालू केली. काही वर्षांनंतर त्याच आस्थापनाने पुन्हा विज्ञापन करून त्यामध्ये ‘तुमच्या ‘पेस्ट’मध्ये मीठ आहे का ?’, असा प्रश्न विचारला जायचा. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ‘पेस्ट’मध्ये मीठ आणि कोळसा टाकून नवीन पेस्ट विक्रीसाठी आणली अन् ‘ती कशी चांगली आहे ?’, ते पटवून देऊन ती घेण्यास ग्राहकांना भाग पाडले.
यातून एक लक्षात येते ते, म्हणजे ‘प्रथम मीठ आणि कोळसा तुमच्या दातांना कसे हानीकारक आहेत ?’, हे सांगितले आणि काही वर्षांनी ‘तेच मीठ अन् कोळसा तुमच्या दातांना कसे लाभदायी आहेत ?’’, हे सांगून ग्राहकांना ते घेण्यास भाग पाडले. बहुराष्ट्रीय आस्थापनांना ठाऊक होते की, भारतियांना मीठ आणि कोळसा वापरण्यापासून आपण परावृत्त करत नाही, तोपर्यंत त्यांचे दात खराबच होऊ शकत नाहीत अन् आपण त्यांना स्वतःचे दंतविषयक एकही उत्पादन विकू शकणार नाही.’
२. भारतियांनी आचारधर्माप्रमाणे बोटाने दात घासणे बंद करणे आणि पाश्चात्त्यांप्रमाणे ‘ब्रश’ वापरल्याने दातांचे संरक्षक कवच न्यून होऊन त्यांत कीड पडणे
आपण पूर्वी दंतमंजन घेऊन बोटाने दात घासत होतो. बहुराष्ट्रीय आस्थापनांनी विज्ञापनाच्या माध्यमातून ‘बोटांनी दात घासण्यापेक्षा ‘पेस्ट’ आणि ‘ब्रश’ यांचा उपयोग करून दात घासलेले चांगले’, हे पटवून दिले. त्याप्रमाणे आपण या दोन्ही वस्तूंचा वापर करू लागलो. इथे लक्षात घेण्याचे महत्त्वाचे सूत्र, म्हणजे ‘आपण दात आणि हिरड्या यांना बोटाने दंतमंजन लावून घासतो. त्या वेळी त्यांना एक मालिश होत असते आणि त्यामुळे स्वतःच्या हिरड्या मजबूत होत असतात अन् दंतमंजनामधील आयुर्वेदातील औषधांमुळे दातांमध्ये कीड पडत नव्हती, तसेच दात मजबूत रहायचे.’ आता आपण ‘पेस्ट’ आणि ‘ब्रश’ वापरायला लागल्यामुळे आपल्या दातांवर असलेले एक प्रकारचे आवरण म्हणजेच एक संरक्षक कवच घासले जाऊन दातांची गुणवत्ता न्यून होते. याच समवेत हिरड्या घासल्या गेल्यामुळे त्यावरचे आवरणही न्यून झाले. आपण स्वतःहून पेस्ट आणि ब्रश यांचा उपयोग करून स्वतःचे दात खराब करू लागलो.
पूर्वी आपल्या घरातील आजी-आजोबा, पणजोबा यांना कधी दातांचे त्रास झाले नाहीत कि कधी यांच्या तोंडाला वासही आला नाही. आपल्याला चुकीच्या पद्धती आणि विज्ञापने यांना भुलवून ते घेण्यास भाग पाडले आणि आपण आपल्या दातांची हानी करत गेलो.’
– निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी, देवद, पनवेल (२८.७.२०२२)