हिंदु धर्मात श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही, असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही, इतके मार्ग सांगितले आहेत. यावरून प्रत्येकालाच श्राद्ध करणे किती आवश्यक आहे, हेही कळते.
१. ‘योग्य ब्राह्मण न मिळाल्यास, मिळतील ते ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे.
२. मातेच्या श्राद्धाला ब्राह्मण मिळाले नाहीत, तर सुवासिनी सांगून श्राद्ध करावे.
३. अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत, तर एक ब्राह्मण सांगून, त्याला पितृस्थानी बसवावे अन् देवस्थानी शाळिग्राम वगैरे ठेवून, संकल्प करून श्राद्ध करावे आणि ते पान गायीला घालावे किंवा नदी, तळे, सरोवर, विहीर इत्यादींमध्ये सोडावे.
४. राजकार्य, तुरुंगवास, रोग किंवा इतर काही कारणे यांमुळे स्वतः श्राद्ध करण्यास असमर्थ असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मण यांच्याद्वारे श्राद्ध करावे.
५. संकल्पविधी करावा, म्हणजे पिंडदानाखेरीज बाकी सर्व विधी करावेत.
६. ब्रह्मार्पणविधी करावा, म्हणजे ब्राह्मणाला बोलावून हातपाय धुतल्यावर, त्याला आसनावर बसवून, पंचोपचारे पूजा करून भोजन घालावे.
७. होमश्राद्ध करावे, म्हणजे द्रव्य आणि ब्राह्मण यांच्या अभावी अन्न शिजवून ‘उदीरतामवर०’ या सूक्ताची प्रत्येक ऋचा म्हणून होम करावा. (हे उत्तरक्रियेच्या वेळी पहाण्यास मिळते.)
८. वरील काहीही करण्यास असमर्थ असलेल्या माणसाने पुढील पर्याय अवलंबावेत. (यांतील दानाच्या वस्तू पुरोहित, संत किंवा एखादे देवस्थान यांना द्याव्यात. – वेदमूर्ती केतन शहाणे.)
यथाशक्ती भोजन किंवा कोरडा शिधा द्यावा. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. केवळ पिंडदान करावे. उदकपूर्ण कुंभ द्यावा. तीळ द्यावेत. स्नान करून तीळयुक्त पाण्याने पितृतर्पण करावे. गायीला गवत घालावे. श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी उपवास करावा. श्राद्धाच्या दिवशी श्राद्धविधी वाचावा.
या सर्व प्रकारांवरून, प्रतिवर्षी येणार्या श्राद्धादिवशी पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केले पाहिजे, त्याविना राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश असल्याचे लक्षात येते.’
संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’