(म्हणे) ‘येशू ख्रिस्त हेच एकमेव भगवान असून इतर कोणतीही देवता किंवा देवी (शक्ति) नाहीत !’

राहुल गांधी यांच्या भेटीत पाद्री जॉर्ज पोन्नैया यांचे आक्षेपार्ह विधान !

कॅथॉलिक पादरी जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कन्याकुमारी (तमिळनाडू) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी कन्याकुमारीमध्ये असतांना कॅथॉलिक पादरी जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात राहुल गांधी त्यांना विचारतात, ‘येशू हेच देवाचे रूप आहेत, हे सत्य आहे का?’ पादरी पोन्नैया राहुल गांधी यांना सांगत आहेत, ‘येशू ख्रिस्त हेच एकमेव भगवान आहेत. इतर कोणतेही देवता किंवा देवी (शक्ति) नाहीत.’ त्यांच्या या विधानावर टीका होत आहे. गेल्या वर्षी जुलै मासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात द्वेषपूर्ण विधाने केल्याने पाद्री पोनैया यांना अटकही झाली होती.

१. या व्हिडिओवर भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी म्हटले आहे की, हे काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियान नसून ‘नफरत (द्वेष) जोडो’ अभियान आहेे. पोन्नैया यांनी हिंदूंच्या देवतांचा अपमान केला असून यापूर्वी भारतमातेविषयी अयोग्य विधाने केली आहेत. या भेटीतून काँग्रेसचे विचार आणि तिची हिंदूविरोधी भूमिका दिसून येते. काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा इतिहास आहे.

२. भाजपच्या टीकेवर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले की, त्या व्हिडिओत जे आहे, त्याचा पक्षाशी संबंध नाही. ‘भारत जोडो’ यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाजपवाले बिथरले असून खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • राहुल गांधी यांना ‘हे विधान मान्य आहे कि नाही’, हे त्यांनी भारतियांना जाहीररित्या सांगायला हवे, अन्यथा त्यांना हे विधान मान्य आहे, असेच समजले जाणार !
  • जर काँग्रेसवाल्यांना हे विधान मान्य आहे, तर त्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते ! एरव्ही निवडणुका आल्यावर जानवे घालून मंदिरात जाणारे राहुल गांधी ढोंगी आहेत, हेच यातून स्पष्ट होईल !